हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ
पुस्तक / साहित्य/नाटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक / साहित्य/नाटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

तुंबाड

तुंबाड हा फक्त एक सिनेमा नसून, स्वतःला त्यात गुंतवणारा एक अनुभव आहे. पुस्तकातील भयकथा वाचताना जसे चित्र डोळ्या समोर उभे राहते अगदी तसेच इफेक्ट देऊन सिनेमा उभा केला आहे. प्रत्येक प्रसंगातील एक एक डिटेलिंग एवढे सुंदर आहे कि, पुस्तक वाचताना आपण जसे रिडींग बिटवीन द लाईन्स करतो अगदी तसे घडते.
मुळात तुंबाड हि रवी बर्व्यानी लिहिलेल्या कथेवर लवक्राफ्ट ह्यांच्या 'हस्तर' ह्या काल्पनिक दैवाची, स्टीवन किंगची 'ग्रॅम्मा' आणि त्याचे भावांतर असलेली नारायण धारपांची 'आजी' आणि ऋषिकेश गुप्तेनी पुढे जाऊन त्यावर आधारित लिहिलेल्या 'गानू आजी' ह्या सर्वांचे संस्कार आहेत. एवढे संस्कार घेऊन कथा लिहिताना आणि दिग्दर्शित करताना त्याला नक्कीच न्याय मिळाला आहे असे मला वाटते. नारायण धारपांचा आणि त्यांच्या लिखाणाचा मी चाहता असल्याने मला वाटते कि त्यांच्या 'आजी' आणि 'बळी' ह्या दोन कथांची एकत्र सांगड घालून तयार झालेली कलाकृती म्हणजे 'तुंबाड'.
तुंबाड च्या कथेला धारपांच्या कथेचे स्फुरण आहे हे स्वतः रवी बर्व्यानी मान्य केले असले तरी हा सिनेमा एक मास्टर पीस आहे. दिग्दर्शन आणि ऍनिमेशन ह्याची एक सुंदर सांगड घातलेली आहे असे म्हणायला हरकत नाही, फक्त पुण्याचे काही रटाळ सिन सोडता.

पुढील लिखाण हे सिनेमा न बघितलेल्यानी वाचू नये (!! स्पॉईलर अलर्ट !!)

सिनेमा मध्ये मी केलेलं रिडींग बिटवीन द लाईन्स :
१) 'विनायक' आणि 'सदाशिव' हे वाड्यात राहण्याऱ्या म्हाताऱ्या 'सरकार' ची अनैतिक मुलं असून त्यांच्या घरात राहणारी म्हातारी ही त्या म्हाताऱ्या सरकारची आई आणि त्या मुलांची आजी आहे.
२) म्हातारीला 'हस्तर' झपाटल्याने, देवीच्या गर्भातील सोने काढण्याची पद्धत त्या म्हाताऱ्या सरकारला कळली नाही आणि त्या मुळे त्याला खजिना कधीच मिळाला नाही.
३) म्हातारीला जीवनातून मुक्त करण्याच्या अटीवर विनायकला पध्द्त समजली, आणि म्हातारीला चपळतेने विहिरीत उतरता येत असल्याने तिला तिचा नवरा मेल्यावर सुद्धा सती जाऊन दिले नव्हते.
४) मुळात गर्भात दाखवलेला 'हस्तर' हा लोभाचे प्रतीक आहे आणि त्यामुळे अति लोभाने जास्त प्रमाणात आणलेल्या पिठाच्या बाहुल्यांनी जास्त 'हस्तर' प्रतिमा तयार केल्या.

तेव्हा तुम्हाला ह्या सिनेमा बद्दल काय वाटले ते नक्की कळवा !

आपला,
(भयकथा प्रेमी) विशुभाऊ  

रविवार, ८ मार्च, २०१५

वाडा चिरेबंदी

एखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव तोडणारी किंवा परके पणाची भावना देणारी असते. एकदाका मनुष्य आपले घर सोडून दुसरी कडे संसार थाटून राहिला कि तो आपल्या मूळ घराला पाहुणाच होतो ; मग मनुष्य म्हणजे त्या घरची लाडकी लेक असो कि वंशाचा दिवा.
माणसाच्या कौटुंबिक स्वभावावर, काळा प्रमाणे भावंडांच्या स्वभावात आलेल्या कटुतेवर, अप्पलपोटी पणावर तसेच एकाच जातीतल्या पण वेगळ्या पोट जातीतील हेवे-दाव्यांवर केलेले स्पष्ट भाष्य म्हणजे महेश एलकुंचवार लिखित नाटक 'वाडा चिरेबंदी'. ह्या नाटकातली पात्रं समोरच्या अंधारात क्षुद्र स्वार्थ जपताहेत, पण त्याचवेळी त्यांचा जीव परस्परांसाठी तुटतोही आहे. आतडं सोडवून घेता घेता ते अधिकच गुंतत जातं आणि ह्या सगळ्याच्या तळाशी असते नितळ माणुसकी! ह्या नाटकातून उमजलेलं मानवी जीवनातलं हे सत्य रसिकांना अंतर्मुख करतं आणि स्वतःचं प्रतिबिंब त्यात दिसतं. वऱ्हाडी संस्कृती मध्ये ३०-३५ वर्षां पूर्वी लिहिलेले हे नाटक आजही सर्व ठिकाणी लागू होते. काळानुरूप माणसाच्या गरजा बदलतात, वेशभूषा बदलते, भाषा बदलते पण स्वभाव बदलत नाही.

१ मे १९८५ रोजी कालभैरव या संस्थेने दादर मधल्या शिवाजी मंदिर येथे ह्या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. विजया मेहता यांनी ते दिग्दर्शित केले होते. त्यानंतर महेश एलकुंचवार यांनी त्याचे पुढचे दोन भाग ‘युगांत’ आणि ‘भग्न तळ्याकाठी’ लिहिले. १९९४ मध्ये या दोन भागांसह ‘वाडा चिरेबंदी’ या तिन्ही नाटकांचा ९ तासांचा एकत्रित प्रयोग ‘त्रिनाट्यधारा’ नावाने गाजला. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केले होते. आता यातील पहिला भाग म्हणजे नाटक ‘वाडा चिरेबंदी’ पुन्हा 'अष्टविनायक' आणि 'जिगीषा' या दोन नाट्यसंस्थांकरवी व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे.
नक्कीच पहावे आणि अनुभवावे असे हे दोन अंकी नाटक संग्रहित करण्या योग्य सुध्दा आहे.

आपला,
(रसिक) विशुभाऊ

पुस्तकवाले डॉट कॉम वर पुस्तक रूपात नाटक उपलब्ध आहे.

रविवार, १ मार्च, २०१५

नर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय

भारतवर्षातील अनेक नद्यां पैकी नर्मदा नदी हि अशी एकमेव नदी आहे जिची अनेक शतकानुशाताकांपासून विधीपूर्वक परिक्रमा केली जाते. नर्मदा परिक्रमा अतिशय खडतर तीनहजार किलोमीटर अंतर असलेली परिक्रमा आहे. हिमालयात जसे अनेक योगी, संत, समाधी अवस्थेत साधना करतात आणि त्यांचे अनुभव सर्वज्ञात आहेत, तसेच नर्मदेच्या परिसरात अनेक साधकांना योग्यांचा आणि ऋषीतुल्यांचा साक्षात्कार तसेच दर्शन झाले आहे.

परिक्रमेची सुरुवात नर्मदेचा उगम असलेल्या अमरकंटक येथून परंपरे प्रमाणे केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला नेमावर किंवा ॐकारेश्वर येथून सुध्दा सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेचा साधा ओघळ सुध्दा ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणार्या नद्या ओलांडलेल्या चालतात. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी असा संकेत आहे. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत 'ॐ नर्मदे हर' या मंत्राचा जप व नामस्मरण करायचे असते.

परिक्रमेदरम्यान आयुष्‍य 'सूर्योदय ते सूर्यास्त' व 'सूर्यास्त ते सुर्योदय' या दोन काळांमध्ये विभागले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्‍या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही. 

मराठी भाषेत नर्मदे परिक्रमेवर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. गो.नी. दांडेकरांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा' व 'नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा', धृव भट्ट यांनी लिहिलेले 'तत्वमसि', जगन्नाथ कुंटे ह्यांचे 'नर्मदे ऽऽ हर हर', रघुनाथ रामचंद्र गुण्ये ह्यांचे 'नर्मदे हर'. ह्या पैकी जगन्नाथ कुंटे ह्यांचे 'नर्मदे ऽऽ हर हर' वाचणे म्हणजे निव्वळ परिक्रमा करण्याचा मिळणारा अनुभव.

जगन्नाथ कुंटे ह्यांची लिखाणशैली वाचकाला नर्मदा परिक्रमेवर घेऊन जाते. त्यांचे अनुभव, त्यांना दिसणारी दृश्ये हि अक्षरशः वाचकाला दिसू लागतात. त्यांची लिखाणातील म्हणा किंवा मूळ स्वभावातील म्हणा विनोदी आणि मनमौजी छटा अध्यात्माचे रटाळ किंवा कोरडे फटके न वाटता प्रेमळ अनुभव देतो. त्यांची आपल्या सद्गुरु वरील श्रद्धा आणि नर्मदा माते वरील भक्ती आणि ह्या जोरावर पूर्ण केलेली खडतर परिक्रमा व त्यात आलेले अनन्यसाधारण अनुभव म्हणजे त्यांचे पुस्तक 'नर्मदे ऽऽ हर हर'.

पुस्तकाची सुरवात हि रटाळ प्रस्तावनेने न होता परिक्रमेच्या मजेदार अनुभव साराशांने होते, जसे परिक्रमा चालू केल्यावर लेखकाला समजलेल्या गोष्टी त्यांनी इथे सांगितल्या आहेत " परिक्रमेत मीठ ह्या खारट पदार्थाला 'रामरस' म्हणतात; चावलराम; दालराम; सब्जीराम; चपातीराम अशी जेवण्याच्या पदार्थाला 'राम' लावण्याची पध्दत.… ". पायी परिक्रमा करणाऱ्या लेखकाचा काटकपणा, अगदी कमी आहार, पराकोटीची सहनशीलता, त्यांची चालण्याची गती ह्या साऱ्या वर्णनात वाचक गुंतून, गुंगून समरस होऊन जातो. मनातल्या क्षणिक इच्छांची पूर्तता किंवा अडचणींचे निवारण आपोआपच होण्याचे प्रसंग वाचताना अचंबित व्हायला होते. नर्मदा परिसर, त्या काठावरचे भिल्ल - आदिवासी, अनेक गावांची, प्रदेशांची नावे इत्यादी भौगोलिक माहिती या पुस्तकातून सुंदर मांडली आहे. तिन्ही परिक्रमांमध्ये शूलपाणीच्या भयंकर जंगलातून लेखकाने केलेला प्रवास व त्यातले अनुभव विलक्षण आहेत. दिंडोरी वरून एका विराण ठिकाणावर अचानक दिसलेली दगडी वास्तू , त्यातील तीन साधू , त्यांनी दिलेला वाफाळलेला चहा आणि तो डोळे मिटून पिताना क्षणार्धात सर्व अदृश्‍य होणे आणि हातात फक्त चहाचा रिकामा ग्लास; नर्मदेच्या प्रवाहातून पुजेची पोहोच म्हणून मोतीचुराच्या लाडवांची टोपली घेऊन येणारी व्यक्ती व तिचे अदृश्‍य होणे यासारखे अनेक अद्‌भुत अनुभव वाचकाला खिळवून ठेवतात.

जगन्नाथ कुंटे यांनी पुस्तकात वर्णन केलेले काही प्रसंग विलक्षण गूढ आणि अनाकलनीय आहेत, घडलेल्या गोष्टींवर जर विश्वास ठेवला तर खरच अतर्कनीय आणि अचंभित अवस्थेत वाचक जातो. उदाहरणार्थ, 'तिसर्या परिक्रमेत त्यांना झालेले अश्वस्थामाचे दर्शन', 'एकदा नदी पार करताना छोट्या मुलीच्या रूपात प्रत्यक्ष नर्मदामाईने दिलेले दर्शन'. तसेच, पुण्यात आल्यावर परिक्रमा पूर्ण झाल्याचा आणि नर्मदा मातेने पूजा स्वीकारल्याचा प्रत्यय म्हणून वृद्ध व्यक्तीच्या रूपात पुन्हा नर्मदामाईने दर्शन दिल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला आहे.

पुस्तका मध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा रंगलेल्या आहेत, तरी त्यात मनाला भावणारी व्यक्ती म्हणजे कुंतल चटर्जी. जगन्नाथाजी यांच्या प्रवासात बरच काळ कुंतल या बंगाली तरुण साधूने सोबत केलेली आहे. सधन घरातला एकुलता एक लाडात वाढलेला उच्चशिक्षित पण शांतीच्या शोधात सर्वत्याग करून घराबाहेर पडलेला कुंतल वाचताना खूप भावतो व आपण किती क्षुद्र वासनेच्या आहारी आहोत ह्याची जाणीव करून देतो.

शूलपाणीच्या जंगलातील अनुभव वर्णन फार सुंदर आहे. हे जंगल मामांकडून लुटले जाण्यासाठी प्रसिध्द आहे. हे मामा म्हणजे काय ते लेखकानेच पुस्तकात फार सुंदर शब्दात सांगितले आहे " शूलपाणीच्या जंगलात पहिल्याच दिवशी एक भिल्ल जमात तुम्हाला लुटते. 'नर्मदापुराणा'त त्यांना 'नर्मदेचे भाऊ' म्हटले आहे. म्हणून त्यांना 'मामा' म्हणतात. ते लुटतात आणि आपण लुटून घ्यायचे. जन्मभर हे माझे, हे माझे करून आपण आसक्तीने वस्तू जमा करतो. ती आसक्ती सुटावी हा लुटण्याचा मुख्य हेतू. हेतू चांगलाच आहे. लुटणारा आणि लुटून घेणारा दोघेही भाग्यवान. सुखी जीव."  पहिल्या परिक्रमेतला लेखकाचा शूलपाणी मधला अनुभव रोमांचकारी आणि विनोदी दोन्ही आहे. मामांनी लुटल्यावर जगन्नाथजी ह्यांच्या कडे देव आणि अंगावर लंगोट एवढेच राहिले होते. 

लेखकाने शक्तीपाताची दीक्षा घेतलेली असल्याने साधना करताना कुंडलिनीच्या क्रिया व त्या मुळे होणारी योगासने व ती पाहून अनेक लोकांनी त्यांच्या कडून दीक्षा मिळवण्या साठी केलेला खटाटोप. भावनेच्या भरात दुष्काळी गावाला दिलेला पावसाचा आशीर्वाद खरा होणे व त्यामुळे लोकांची झालेली वाचासिद्धीची समजूत. अश्या अनेक चमत्कारीत गोष्टी वाचताना आश्चर्य वाटते पण तरी लेखक त्यात स्वतःला काहीही लौकिक देत नाही. 

लेखक जगन्नाथ कुंटे हे लहानपाणा पासून अध्यात्मिक प्रवृत्तीचे. वयाच्या दहाव्या वर्षी जेव्हा सर्वसाधारण मुलं खेळण्यात रमलेली असतात तेव्हा हे हिमालयात निघून घेले होते. संसारात असतानाही साधने साठी ह्यांची भटकंती चालू. साधनेत असताना किंवा परिक्रमेत असताना घराची, बायको-मुलांची त्यांना आठवण नाही, ओढ नाही. जेव्हा साधनेची मस्ती उतरते तेव्हा एक सामान्य, अशिक्षित माणूस. सतत सिगरेट ओढतात, त्यामुळे अध्यात्मातला माणूस असेल असं सांगूनही खरं वाटणार नाही असे व्यक्तिमत्व. व्यावहारिक जगात सगळ्यांच्यात देव बघायची त्यांची वृत्ती पुस्तकातील वाक्यागणिक दिसून येते.

लेखका इतकच कौतुक वाटावं ते त्यांच्या पत्नी सौ. जानकी कुंटे यांचं. नवरा घरातून कधीही उठतो आणि ' निघालो' असं सांगतो, बायकोला नमस्कार करतो आणि हिमालयात किंवा नर्मदा परिक्रमा करून ३-४ वर्षांनी घरी परत येतो. तरी ह्या माऊलीची ह्याबद्दल कुठेही तक्रार नाही कि कटकट नाही. संपूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर घेऊन ह्या मातेनी संसारात राहून केलेली 'साधना' खरोखर महान आहे. हि तीच माता जिने भटकंती करणारा संन्यासी प्रवृत्तीचा नवरा असताना 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे अप्रतिम पुस्तक लिहिणारा लेखक घडवला.

'नर्मदे ऽऽ हर हर' हे पुस्तक म्हणजे धार्मिकतेचा किंवा अध्यात्मिकतेचा बाऊ करणारे नसून धर्माची दुकानदारी आणि बुवाबाजीची फसवेगिरी ह्यावर फटकेबाजी करणारे सुध्दा आहे. ह्या पुस्तकाचे लिखाण एकसुरी नसून बहुमितीय आहे. ह्या पुस्तकात मेधाताई पाटकरांच्या कार्याबद्दल देखील तळमळीने लिहिले आहे. स्वतःला संन्यासी म्हणवणाऱ्या तामसी प्रवृत्तीच्या लोकांवर कोरडे ओढले आहेत आणि त्याच वेळी 'चमत्कार' वाटावा असे अनुभव सहजतेने सांगितले आहेत. एका झपाटलेल्या नर्मदा परीक्रमेचे हे कथन नक्कीच वाचनीय आणि संग्रहित करण्यायोग्य आहे.

आपला,
(परिक्रमावासी) विशुभाऊ रणदिवे 

शुक्रवार, २४ मे, २०१३

सोनेरी टोळी

Soneri Toli
'सोनेरी टोळी' हि १९१५ साली नाथमधवांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे एका नैतिक तत्वांवर चालणाऱ्या पण परिस्थितीमुळे आड मार्गाने पैसा कमावणाऱ्या १२  भामट्यांची कथा. हि कादंबरी एक शतक जुनी असली तरी त्यातले अनेक सामाजिक संबंध आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात.
मुंबई मध्ये एका चाळीत बिऱ्हाड असलेल्या १२ मित्रांची सद्मार्गाने पैसे कमावण्याची सर्व दारे जेव्हा बंद होतात, तेव्हा अनैतिक पद्धतीने कमावणाऱ्या पण उजळ माथ्याने फिरणाऱ्या समाज घटकांना अद्दल शिकवण्या साठी हि लोकं एक टोळी स्थापन करतात तीच टोळी म्हणजे 'रायक्लब' उर्फ 'सोनेरी टोळी'. अनेक शकला लढवून लोकांना टोप्या घालणारे त्यांचे किस्से वाचताना खूप मौज वाटते आणि हसायला सुध्दा येतं.
तत्कालीन आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सुध्दा छान प्रकारे प्रकाश पाडला आहे. त्यावेळी समाजात असलेल्या जाती भेद, स्त्री शिक्षण आणि विधवा पुनःविवाह इत्यादी विषयांवर सुध्दा परखड भाष्य केलेले आहे, भले ते आपल्याला आता ते मुळीच रुचत नसले तरी त्यावेळची जन मानसिकता समजते.
१९ व्या व २० व्या शतका मध्ये अनेक सुन्दर सहित्य निर्माण झाले आणि ते आता लुप्त होण्याच्या मर्गावर आहे, तरी ते वाचताना एक गोष्ट प्रखरतेने जाणवते ती म्हणजे आपण त्या नंतर अजून पर्यंत साहित्यात काहीच प्रगती केलेली नाही. हे जुने साहित्य पुनः उपलब्ध करून दिल्याबद्दल 'समन्वय प्रकाशन' चे मनापासून आभार.
आपला,
(वाचक) विशुभाऊ

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

शाळा


मी मुकुंद जोशी उर्फ जोश्या. मागच्या वेळी जाता जाता पांडुरंग सांगवीकर लिहून गेला म्हणून विशुभाऊने आता पण मलाच लिहायला बसवले. पांडू बोलतो तसा विशुभाऊ चाप्टरच, मला जाता जाता पांडू सांगून गेलाच कि ह्याच्या बरोबर ऑफिसला जाऊ नको हा काम धाम सोडून आपल्याशी गप्पा मारत बसतो. पण विशुभाऊने सुम मध्ये शनिवार रविवार मध्ये सगळ्या गप्पा आटोपल्या. इचिभना, विशुभाऊने मी इथे यावे म्हणून खोटे सांगितले शिरोडकरच्या बाबांची बदली सिंगापुरात झाली आहे.
बोकीलांनी मला नाव वगैरे दिले, पण मी म्हणजे शाळेत गेलेला प्रत्येक मुलगा. शाळेत सुऱ्या, फावड्या, चित्र्या, बिविकर वगैरे सारखी सगळीच मुलं असतात, पण शाळा वाचताना प्रत्येकजण स्वतःला जोश्याच समजतो. शाळेत प्रत्येकाची एकतरी लाईन असतेच नसल्यास नरूमामा म्हणतो तसं त्याने आपली 'वैद्यकीय चाचणी करून घ्यावी'. लाईनिचा विषय चालू असताना विशुभाऊने मला दिप्याची गोष्ट सांगितली आणि आम्ही बराच वेळ हसत होतो. मी पण उगाच विशुभाऊला डिवचल्यवर त्याने तर कहर केला, त्याच्या शाळेतल्या १०-१२ शिरोडकर सांगितल्या.
शनिवारी संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. इथे मुलं मुली कधीही आणि कुठेही मिठ्या मारून मुके घेत उभे असतात. सुऱ्या असता तर त्याने उच्छाद मांडला असता. पण अश्लील काम भिंती आडच करतात आपल्या सारखे नाही दिसले झाड चालू. इथला समाज आणि आपला थोडा वेगळा आहे. शाळा वाचून झाल्यावर हेरंबने बरेच 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करून आपल्या ब्लॉग वर ह्या पुस्तकातून दिसणारं आपल्या समाजाचं, शिक्षणपद्धतीचं, संस्कारांचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, नाजूक वयातल्या मुलामुलींमधल्या सुप्त आकर्षणाचं, नातेसंबंधांचं, भावभावनांचं वगैरे स्पष्टीकरण दिले आहे.
माझ्या इयत्ता नववी वरती लिहिलेले हे पुस्तक सुजय डहाकेने चित्रित करायचा प्रयत्न केला, पण मला नाही वाटत ते तेव्हडं जमलं. पण त्यात शिरोडकर एकदम पर्फेक्ट घेतली. तसंही म्हणा एक आख्खे वर्ष त्यात एवढे 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करून ३ तासात बसवणं सोप्पं नाही.
बोकीलांनी लिहिलेले आणि माझ्याकडून वदवलेले हे वाक्य मात्र तितकेच खरे 'त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणंफार सुंदर आहे.'
आपला,
(शाळेतला) जोश्या

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

कोसला

kosala
खरेतर हे विशुभाऊने स्वतः लिहायला पाहिजे होते. पण भालचंद्र नेमाड्यांनी मला 'शंभरातल्या नव्व्याण्णवांस' अर्पण केल्या मुळे आणि विशुभाऊ ९९% मधला निघाल्या मुळे, अगदीच सामान्य निघाला. तसा सुरवातीला मी आकाश गुप्ते कडे होतो तेथून सौरभ बोंगाळे कडे आणि नंतर विशुभाऊ कडे आलो. सुरुवातीला मला थोडे फार उदाहरणार्थ चाळल्या नंतर विशुभाऊ मला सिंगापूरला घेऊन निघाला पण वजन जास्त झाल्यामुळे मी पुन्हा घरी गेलो. दिवाळीत एकदाचा मी सिंगापूरला पोहचलो. खरं तर तुम्हाला वगैरे सांगण्या सारखे एवढेच.
इथे आल्यावर सुरुवातीला दोन दिवस विशुभाऊने मला कपाटातच ठेवले. नंतर उदाहरणार्थ त्याच्या बरोबर ऑफिसला, चहाला, जेवायला आणि सगळी कडेच जायला लागलो. तो कामाच्या नावाखाली कंपनीला फसवतो वगैरे हे मला लगेच कळले. सुरुवातीला विशुभाऊला असे वाटत होतं कि मी सायको वगैरे आहे. पण नंतर त्याला उत्साह वगैरे यायला लागला. एकदा आम्ही ऑफिस मध्ये रंगात आलो असताना अचानक भले मोठे काम आले. त्याने उदाहरणार्थ सर्वर वरच्या एक दोन लायब्ररी फाईल बदलल्या आणि ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे सांगुन सिस्टीम ऍडमीनला कामाला लावले. मला कळले हा इचल्या पेक्षा चाप्टर आहे. पण मनू  गेली तेव्हा हा ऑफिस मध्ये सुध्दा रडला. मला म्हणाला नंतर तू अजंठाला गेलास ते बरे. पण बदललास.
ऑफिसमध्ये येता जाता बस मध्येतर आम्ही धिंगाणा घालायाचोच पण रात्री जेवताना तर धमाल. सिंहगडची गोष्ट सांगताना तो इतका रंगला कि माझ्या ऐवजी तोच घसरून पडला बसल्या बसल्या. त्या हॉटेल मधल्या मलय बाईने माझ्या कडे पाहून विचारले 'व्हीच भाषा' तर पठ्ठ्याने लगेच सांगितले 'मराठी भाषा'. ह्याने आपल्या भाषेचा चांगलाच प्रचार केलेला आहे.
तर मी बापाचा पैसा खर्चावून परीक्षा वगैरे नीट कधीच दिल्या नाहीत आणि म्हणूनच तुम्हा लोकांच्या म्हणजे 'शंभरातल्या नव्व्याण्णव' जणांच्या हृदयात बसू शकलो. आता इथे वगैरे सांगणे एवढेच. पुढे तुम्हीच वाचा. मी निघतो आहे. विशुभाऊ कडे उद्या पासून शाळेतला जोशी पुन्हा येतो आहे.
तर मी वर्ष च्या वर्ष फुकट घालवून कमावले काहीच नाही. तेव्हा गमावली हि भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबर.
असाच लोभ असावा.
आपला,
पांडुरंग सांगवीकर

रविवार, २ जानेवारी, २०११

झिरो डायल

गेले ५ महिने वाचन आणि लिखाणाच्या बाबतीत माझे फार उदासीन गेले . पण मागील आठवड्यात थोडा व्यापातून मोकळा झालो आणि "Zero Dial" हे 'जे. डे' यांनी लिहीलेले व  'जयको पब्लीकेशन' यांनी प्रकाशीत केलेले पुस्तक वाचायची संधी मिळाली.
हे पुस्तक, पोलिसांचे खबरी (informers) आणि त्यांचे आयुष्य व त्यातिल संकटं ह्यांचा आढावा घेणारे सत्य घटणेवर आधारीत नव्हे सत्यघटणाच सांगणारे व एका पत्रकाराच्या द्रुष्टीने प्रकाश टाकणारे आहे.
तिन खबरी आणि पोलिस ह्यांनी केलेली कामे आणि त्यातिल फसवे व किळसवाणे राजकारण . . .  दाऊद- छोटा राजन ह्यांच्या टोळी युध्दात खबरींनी केलेली कामे. . . एक फार घाणेरडं जग जे ड्रग्ज, गुह्णे आणि कुंठणखाना ह्यांनी भरलेलं आणि त्यात शोधत जगणारा आशावाद. . .  भरतातील कुख्यात अतंकवादी रियाज़ भटकळ ह्याचा पाठलाग व खबरीं, पोलिस आणि इंटेलिजन्स ब्युरो यांनी केलेली मेहनत. . . ह्या सगळ्या मुद्यांचा मेळ ह्या पुस्तकात फार सुंदर प्रकारे घातला आहे .
डे हे मुंबई मधले एक प्रसिध्द पत्रकार आहेत व त्यांच्या प्रतिभावंत लिखाणामुळे वाचनाची मजा काही ऒरच होती. . . .


आपला,
(वाचक) विशुभाऊ..

बुधवार, १२ मे, २०१०

टुगेदर

माणूस आणि  त्याचे मन , हा वर्षानु वर्षे  सुटलेला गुंता  तेच  मन ताब्यात ठेवण्यासाठी माणसानेच बनवलेली चाकोरी , धर्म बंधने वगैरे वगैरे.  ह्याच मनाचा एक  भाग म्हणजे सध्या गाजत असलेला कलम ३७७ म्हणजेच समलैंगीकताझिरो डिग्री प्रोडक्शन चे गौतम परब निर्मित नाटक 'टुगेदरम्हणजे हाच विषय.
ह्या नाटकात दोन लेस्बियन मैत्रिणीत्यांचे हळुवार संबंध  त्यांची मानसिकता फार सुंदर प्रकारे खुलवून दाखवलेली आहेहे नाटक म्हणजे फक्त समलैंगीकता नसून चाकोरी बाहेर विचार करणार्याचा  स्वतः चे अस्तित्व शोधणार्या एका व्यक्तीचा लढा आहेविनी ह्या पत्राला स्वतःला सिध्द करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तिला आलेले अनुभवहे नक्कीच हृदयाला हात घालून जातात.
मी पाहिलेले 'टुगेदरनाटक हे प्रायोगिक नाटक होतेपण हे नक्कीच 'व्हाईट लिलीकिंवा तत्सम नाटकाच्या बरोबरीचे होईल ह्यात तुसभर सुद्धा संदेह नाही.

आपला,
(नाटकी) विशुभाऊ

शनिवार, १० ऑक्टोबर, २००९

बाबा

    आज सिध्दार्थ च्या सांगण्यावरून पुर्वी न उमगलेल संदिप चे " दमलेल्या बाबाची कहाणी" हे गाणे आई ऎकले, खरच काळीज फाडणारे गाणे आहे. खरेतर हे गाणे म्हणजे संदिप ने स्वतःच्याच गाण्याला "दूरदेशी गेला बाबा..." ला दिलेले उत्तर.... आता बाबा झाल्यावर त्या पद्यातील दर्द, आणि आश्रू कळले....

    आज काल घरातील आई आणि बाबा हे दोघेही नोकरी करतात आणि त्यामुळे ज्या बाळाला जास्त गरज असते, त्यालाच वेळ देऊ शकत नाही.... संदिप च्या कवितेतली छोटी मुलगी ,आई वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेली.... बिचारी एकटीच घरी...

        कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
        चार भिंतित धावुन दिसभर दमवला
        ' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही ॥
लहान असताना, माझी आई दुपारी मला जवळ घेउन ’आता पुरे ! झोप सोन्या...’ बोलायची.... पण माझ्या सोनाला तर मी पाळणा घरात ठेवले !

        कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
        कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
        खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही ॥
शाळेला सुट्टी म्हणजे मजा असे वाटणारा मी... पण माझी पोर सुट्टी च्या नावने खिन्न होते कारण.. तेच "खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही"...


        दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
        दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
        फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही ॥
मी लहान असताना वाटेल तेव्हा आई-बाबांचे बोट धरून बाहेर फिरायला जात असे, पण माझ्या छोटीच्या मुठीमध्ये मात्र माझे बोट नाही..

        नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
माझ्या पोरीच्या डोळी झोप दाटली आहे.... आणि मी द्रुष्ट घरी नाही.....

ह्या सर्व दिवसात स्वतःच दमून भागुन माझी परी झोपली... आणि मी घरी येतो व चालू होते "दमलेल्या बाबाची कहाणी"......

संदिप तुला त्रिवार सलाम !!!!!!!!

आपला,
(एक बाबा) विशुभाऊ..