हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, १ डिसेंबर, २०१२

ये जो मोहब्बत है ....

काल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे रिवाईंड झाली. ते हॉस्टेल, तिथली संध्याकाळ, गणेश तलावावर पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब पाहत तिच्या आठवणीने झुरणारा मी वगैरे पुन्हा अनुभवू लागलो. पावसाळ्यात सुकलेल्या झाडावर नवीन पालवी फुटल्यावर जसे वाटते अगदी तसेच वाटत होते.
आमच्या कॉलेजच्या मागच्या बाजूला गणेश तलाव होतं. तेथे संध्याकाळच्या वेळी तर अजिबात कोणी नसायचे. मी एकटाच रेडिओ घेऊन तेथे बसायचो, फार छान वाटायचे. ते तलाव म्हणजे 'पाय पटेल' च्या गोष्टीतल्या तरंगत्या बेटा पेक्षा सुंदर आणि 'मुकुंद जोशी' च्या त्या दगडा पेक्षा जिव्हाळ्याचे. तलावावर खूप वेग वेगळ्या प्रकारचे पक्षी यायचे. मला आठवते एकदा तर मी सलीम अलींचे पुस्तक घेऊन तेथे बसलो होतो तेव्हा १५ वेगवेगळ्या प्रकारचे सनबर्डस्, ३ प्रकारचे कावळे आणि अनेक पक्ष्यांच्या प्रजाती ओळखल्या होत्या. गर्द झाडीतला आणि वेगवेगळ्या पक्षांनी फुललेला तो तलाव म्हणजे माझा जिवलग मित्र. त्या तलावाने माझ्या त्यावेळच्या अनेक प्रेमगाथा, स्वप्न आणि विरह अनुभवलेली आहेत. माझी त्यावेळची अनेक प्रेमप्रकरणं भले तलावा पर्यंत पोहचली नाहीत तरी गणेश तलावाने ऐकलेली आहेत. तसे म्हणा माझे कुठलेच प्रेमप्रकरण तलावा पर्यंत पोहचले नाही, एकच जे अगदी तडीस गेले म्हणजे लग्न केले. त्याच लग्नाचा ४था वाढदिवस म्हणून हि वाईन उघडली होती.
अचानक रेडिओ वर किशोरदा चे "बूट पॉलिश करेगा ..... फिर भी तुमपे मारेगा" हे गाणे ऐकले आणि थाऱ्यावर आलो. ते प्रेमळ गुलाबी हिरवे दिवस गेले हे आठवून फार वाईट वाटले. ते तिच्यावर मरणं, तिच्या साठी झुरत बसणं, तिला पटवणं, मनवणं, दोघांच्या घरचा विरोध मालवण्यासाठी प्रयत्न करणं वगैरे वगैरे अचानक गायब झालं. सत्या मध्ये मी धोपट मार्गावर येऊन संसाराचा गाडा खेचतो आहे हे आठवल्यावर फार विचलित झालो. उतार वयाला लागण्याचे हे वय नाही हे मला नक्की ठाऊक होतं.
मी रेडिओ बंद केला आणि 'मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो...' हे गाणे लावले आणि डोळे बंद केले. लगेच माझ्या मनातल्या चित्रकाराने अनेक चित्र माझ्या डोळ्यांच्या पटलावर काढल्यावर मी फार खुश झालो आणि गाणे गुण गुणायला लागलो "ये जो मोहब्बत है ...."

आपला,
(प्रेमळ) विशुभाऊ