हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, ८ मार्च, २०१५

वाडा चिरेबंदी

एखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव तोडणारी किंवा परके पणाची भावना देणारी असते. एकदाका मनुष्य आपले घर सोडून दुसरी कडे संसार थाटून राहिला कि तो आपल्या मूळ घराला पाहुणाच होतो ; मग मनुष्य म्हणजे त्या घरची लाडकी लेक असो कि वंशाचा दिवा.
माणसाच्या कौटुंबिक स्वभावावर, काळा प्रमाणे भावंडांच्या स्वभावात आलेल्या कटुतेवर, अप्पलपोटी पणावर तसेच एकाच जातीतल्या पण वेगळ्या पोट जातीतील हेवे-दाव्यांवर केलेले स्पष्ट भाष्य म्हणजे महेश एलकुंचवार लिखित नाटक 'वाडा चिरेबंदी'. ह्या नाटकातली पात्रं समोरच्या अंधारात क्षुद्र स्वार्थ जपताहेत, पण त्याचवेळी त्यांचा जीव परस्परांसाठी तुटतोही आहे. आतडं सोडवून घेता घेता ते अधिकच गुंतत जातं आणि ह्या सगळ्याच्या तळाशी असते नितळ माणुसकी! ह्या नाटकातून उमजलेलं मानवी जीवनातलं हे सत्य रसिकांना अंतर्मुख करतं आणि स्वतःचं प्रतिबिंब त्यात दिसतं. वऱ्हाडी संस्कृती मध्ये ३०-३५ वर्षां पूर्वी लिहिलेले हे नाटक आजही सर्व ठिकाणी लागू होते. काळानुरूप माणसाच्या गरजा बदलतात, वेशभूषा बदलते, भाषा बदलते पण स्वभाव बदलत नाही.

१ मे १९८५ रोजी कालभैरव या संस्थेने दादर मधल्या शिवाजी मंदिर येथे ह्या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. विजया मेहता यांनी ते दिग्दर्शित केले होते. त्यानंतर महेश एलकुंचवार यांनी त्याचे पुढचे दोन भाग ‘युगांत’ आणि ‘भग्न तळ्याकाठी’ लिहिले. १९९४ मध्ये या दोन भागांसह ‘वाडा चिरेबंदी’ या तिन्ही नाटकांचा ९ तासांचा एकत्रित प्रयोग ‘त्रिनाट्यधारा’ नावाने गाजला. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केले होते. आता यातील पहिला भाग म्हणजे नाटक ‘वाडा चिरेबंदी’ पुन्हा 'अष्टविनायक' आणि 'जिगीषा' या दोन नाट्यसंस्थांकरवी व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे.
नक्कीच पहावे आणि अनुभवावे असे हे दोन अंकी नाटक संग्रहित करण्या योग्य सुध्दा आहे.

आपला,
(रसिक) विशुभाऊ

पुस्तकवाले डॉट कॉम वर पुस्तक रूपात नाटक उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा