हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, १३ जून, २०२०

माझा संगीत व्यासंग

माझ्या सारख्या बेताल माणसाला संगीताचा ओलावा कळतो, ह्याच गोष्टीवर मुळात आमच्या कुटुंबाला विश्वास नव्हता.
फार पूर्वी एका संगीत मैफिलीत गवयाने घेतलेल्या सुंदर जागेवर, मी सात मजली आवाजात 'क्या बात है!' अशी दाद दिली तेव्हा संपूर्ण प्रेक्षकवर्ग गायकाला सोडून माझ्या कडे पाहू लागला आणि तो बिचारा गवई त्यावेळी गाणे विसरला. ह्या प्रसंगा नंतर मला कोणी मैफिलीत नेले नाही आणि मी सुद्धा एकांतात रेकॉर्डिंग ऐकून आंनद घेऊ लागलो.
तसे संगीत शास्त्राला खतपाणी घालावे असे काही आमच्या घराचे वातावरण नव्हते. वडिलोपार्जित व्याधी सोडून इतर काहीही न मिळालेले मध्यमवर्गीय आमचे घर. नोकरी करणारे वडील, घरात राबणारी आई, आणि विधात्याच्या कल्पनाशक्तीला सुद्धा आव्हान देणारी खोडकर लहान बहीण. त्यामुळे 'शिकलात तरच तराल' ह्या एका मंत्राच्या तालात माझे बालपण गेले.
शाळेत गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय सोडले तर मला इतर विषय मुळी समजलेच नाहीत. त्या मुळे बहुतेक शिक्षकांच्या आणि इतर वर्गमित्रांच्या दृष्टीने मी तसा उपेक्षितच होतो. एकदा माझ्या एका वर्गमित्राने कळवळून मला म्हटले होतं, 'अरे गणित हा काही आवडायचा विषय आहे का? आवडायचं असेल तर बाजूच्या बेंच वरची कुसुम आवडावी, पण गणित?' असे बोलून कडवट चवीचे आवभाव तोंडावर आणले. मला तेव्हा समजले की दोन विरोधाभासी संचांचा सामायिक घटक हा 'कुसुम' असू शकतो आणि हा एक विषय मित्रांचा कंपू बनवू शकतो.
असो, तर हे झाले विषयांतर.... तर काल माझ्या कुटुंबाला (आदरार्थी एकवचनी) जेव्हा समजले की मी देशपांड्यांच्या मारव्यावर संध्याकाळचा म्हणजे योग्यवेळी डुलतो आहे, तेव्हा तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली... तिने कपाटातील बाटलीत बंद केलेला/ली 'जीन' शोधली आणि एकही 'विष' न मागता बेसिन मध्ये त्याला मुक्त केलं....

आपला,
(रसिक) विशुभाऊ

रविवार, २४ मे, २०२०

पारसिक डेज : लॉकडाऊन शनिवार

लॉकडाऊन मध्ये कसला शनिवार नि कसला रविवार ? तरी शुक्रवार पासून फार महिनातीने तयारी करून मी विकेंड माहोल तयार केला होता.
शनिवार सकाळची सुरुवात ही अगदी पुलंच्या वर्णनातील सुट्टी सारखी झाली होती. आदल्या दिवशी वाचायला घेतलेल्या धारपांच्या गोष्टीतील 'आर्य' त्याच्या साहसाचा पराकोटीला होता, मकरंद वैद्य ने गद्र्यांकडून मागवलेली सुरमई तव्यावर चुरचुरत होती. सर्वेश तरेच्या 'बोंबील' मोबाईल ऍप मधून आलेली कोळंबी शेगडीवर उकळत्या कालवणाची सुवासीक चव सांगत होती.
महावीर आर्य ची साहस कथा आणि माझी उत्कंठता शिगेला पोहचलेली असताना, मी लॉकडाऊन मध्ये माझे मित्र आंब्रे यांनी पराकोटीच्या साहसाने आणि चिकाटीने मिळवलेली आणि मला भेट दिलेली व्हिस्की क्रिस्टल कट ग्लास मध्ये ओतली. ह्या काळात सहजासहजी मिळालेली व्हिस्की सुद्धा सोनाहून पिवळी दिसते... तर असो.... असा सुंदर माहोल तयार असताना अचानक (पण पारसिक नगरी लोकांच्या अंगवळणी पडलेलं नेहमी प्रमाणे) वीज गेली. मला अचानक आठवलं की लॅपटॉप २ दिवस झाले चार्ज केलेला नाही, मोबाईल १% बॅटरी वर आहे आणि इतक्यात हातातील किंडल ने प्राण सोडला .......
अश्या परिस्थितीत , माझ्या सारखा सज्जन हा दुर्जन झाला नसता तरच नवल ...... टोरंटच्या आईला शाब्दिक घोडे लावून पुन्हा चुप्प बसलो !!!!
 आपला,
(पारसिक नगरी) विशुभाऊ

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

तुंबाड

तुंबाड हा फक्त एक सिनेमा नसून, स्वतःला त्यात गुंतवणारा एक अनुभव आहे. पुस्तकातील भयकथा वाचताना जसे चित्र डोळ्या समोर उभे राहते अगदी तसेच इफेक्ट देऊन सिनेमा उभा केला आहे. प्रत्येक प्रसंगातील एक एक डिटेलिंग एवढे सुंदर आहे कि, पुस्तक वाचताना आपण जसे रिडींग बिटवीन द लाईन्स करतो अगदी तसे घडते.
मुळात तुंबाड हि रवी बर्व्यानी लिहिलेल्या कथेवर लवक्राफ्ट ह्यांच्या 'हस्तर' ह्या काल्पनिक दैवाची, स्टीवन किंगची 'ग्रॅम्मा' आणि त्याचे भावांतर असलेली नारायण धारपांची 'आजी' आणि ऋषिकेश गुप्तेनी पुढे जाऊन त्यावर आधारित लिहिलेल्या 'गानू आजी' ह्या सर्वांचे संस्कार आहेत. एवढे संस्कार घेऊन कथा लिहिताना आणि दिग्दर्शित करताना त्याला नक्कीच न्याय मिळाला आहे असे मला वाटते. नारायण धारपांचा आणि त्यांच्या लिखाणाचा मी चाहता असल्याने मला वाटते कि त्यांच्या 'आजी' आणि 'बळी' ह्या दोन कथांची एकत्र सांगड घालून तयार झालेली कलाकृती म्हणजे 'तुंबाड'.
तुंबाड च्या कथेला धारपांच्या कथेचे स्फुरण आहे हे स्वतः रवी बर्व्यानी मान्य केले असले तरी हा सिनेमा एक मास्टर पीस आहे. दिग्दर्शन आणि ऍनिमेशन ह्याची एक सुंदर सांगड घातलेली आहे असे म्हणायला हरकत नाही, फक्त पुण्याचे काही रटाळ सिन सोडता.

पुढील लिखाण हे सिनेमा न बघितलेल्यानी वाचू नये (!! स्पॉईलर अलर्ट !!)

सिनेमा मध्ये मी केलेलं रिडींग बिटवीन द लाईन्स :
१) 'विनायक' आणि 'सदाशिव' हे वाड्यात राहण्याऱ्या म्हाताऱ्या 'सरकार' ची अनैतिक मुलं असून त्यांच्या घरात राहणारी म्हातारी ही त्या म्हाताऱ्या सरकारची आई आणि त्या मुलांची आजी आहे.
२) म्हातारीला 'हस्तर' झपाटल्याने, देवीच्या गर्भातील सोने काढण्याची पद्धत त्या म्हाताऱ्या सरकारला कळली नाही आणि त्या मुळे त्याला खजिना कधीच मिळाला नाही.
३) म्हातारीला जीवनातून मुक्त करण्याच्या अटीवर विनायकला पध्द्त समजली, आणि म्हातारीला चपळतेने विहिरीत उतरता येत असल्याने तिला तिचा नवरा मेल्यावर सुद्धा सती जाऊन दिले नव्हते.
४) मुळात गर्भात दाखवलेला 'हस्तर' हा लोभाचे प्रतीक आहे आणि त्यामुळे अति लोभाने जास्त प्रमाणात आणलेल्या पिठाच्या बाहुल्यांनी जास्त 'हस्तर' प्रतिमा तयार केल्या.

तेव्हा तुम्हाला ह्या सिनेमा बद्दल काय वाटले ते नक्की कळवा !

आपला,
(भयकथा प्रेमी) विशुभाऊ  

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

अंता माते

फट्याकSSS  !
मी सणसणीत कानफटात लगावली आणि बोललो "माझी थट्टा करतोस? अंतरात्मा असे नाव असते का?"
"अरे अंता माते असे नाव आहे माझे , अंता माझे नाव आणि माते शेवटचे नाव !"
इयत्ता आठवीत माझ्या वर्गात आलेल्या नवीन वर्गमित्राला नाव विचारताना घडलेली ही गोष्ट. शेवटचे नाव म्हणजे आडनाव कि अजून काही ते कळले नाही, पण माझ्या ऐकण्यातील चुकी मुळे मी समोरच्याला एक लगावल्याने फार खजील झालो.
"माफ कर मित्रा चूक झाली !"
त्याने हात जोडले आणि म्हणाला "माफी मागणारा देवा पेक्षा थोर असतो.... त्यात तू मला मित्र म्हणालास... तुझा राग कधीच येणार नाही!"
त्याचे तत्वज्ञान ऐकून मी गोंधळून गेलो, माझ्या इतक्या वर्षांच्या मनोवृत्तीला आणि अहंकाराला उभा तडा देणारे होते हे.
गण्या त्यादिवशी शाळेत नसल्याने त्याला मी माझ्या बाकावर बसवून घेतले. तो मन लावून अभ्यासाकडे लक्ष देत होता आणि मी संपूर्ण दिवस धक्क्यातून सावरत नव्हतो.
नंतर कळले की तो ठाण्याच्या कुठल्यातरी आदिवासी पाड्यातला एक आदिवासी आहे. त्यावेळी मला आदिवासी म्हणजे 'झिंगलाला' करणारे धनुष्यबाण वाले असेच वाटत असे. पण हा तसा दिसत नव्हता. रोज चुरगळलेला पण स्वच्छ गणवेश घालून केस विंचरून यायचा. त्याचा 'दादू' म्हणजे मोठा भाऊ त्याला सकाळी रिक्षेने शाळेत सोडायचा आणि नंतर स्वतः दिवसभर रिक्षा चालवायचा.
कालांतराने मी त्याच्याशी एक अंतर ठेवू लागलो. माझा ग्रुप वेगळा, माझे वाचन वेगळे आणि मुळात गप्पा वेगळ्या. पण हा रोज माझ्यासाठी जंगलातील 'मेवा' आणायचा. मेवा म्हणजे बोरांचे, चिंचेचे, तत्सम फळांचे किंवा मधाचे वेगवेगळे प्रकार. माझी खाण्यातील रुची त्याने बरोबर हेरली होती आणि तो ती यथाशक्ती पुरवत होता. मेवा देऊन बदल्यात तो काहीच अपेक्षा धरत नव्हता, ना बोलण्याची ना खेळण्याची ना अभ्यासाची. माझ्याशी मैत्री निभावणे हे देवाने दिलेले कर्तव्य असल्या सारखे निर्मळ मनाने तो पूर्ण करत होता. मी फक्त भोग घेत होतो व तेव्हा मला किंवा माझा मनाला काहीच वाटत नव्हतं.
नंतर इयत्ता ९वी मध्ये त्याला कुठली तरी शिष्यवृत्ती मिळाली आणि तो वसतिगृह असलेल्या कुठल्यातरी शाळेत गेला. जाताना मला सांगून गेला पण मी बेपर्वाईने त्याला 'ठीक' असे बोलून टाटा केला व परत आपल्या दिनक्रमेत रुजू झालो.
ह्या गोष्टीला अंदाजे २२ वर्षे झाली असतील आणि इतक्या मोठ्या कालखंडात तो माझ्या विस्मृतीत गेला.  आज सकाळी ऑफिसला जाताना सिग्नलला माझ्या कारच्या बाजूला कॅम्री उभी होती. मी त्या गाडी कडे पहिले तेव्हा त्या गाडीवाल्याने काच खाली करून माझ्या कडे पहिले व हसला. मला ओळखायला पण फार वेळ नाही गेला तो अंताच होता.
सिग्नल क्रॉस केल्यावर मी गाडी बाजूला घेतली आणि त्याच्या साठी बाहेर आलो. त्याने सुद्धा गाडी बाजूला घेतली आणि काच खाली करून सांगितले "अरे माझी फॅक्टरी पण वागळे इस्टेट मध्येच आहे तुझ्या ऑफिस जवळ, फॉलो मी वी विल टॉल्क देर !"
मी पुन्हा बधिर होऊन बसलो गाडीत 'म्हणजे मी काय करतो आणि कुठे आहे हे त्याला माहित आहे !' .......

"हम बेवफा हो गये पर यार यारी निभाता रहा !!!"

आपला,
(मित्रनिष्ठुर) विशुभाऊ

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

मालिनी

ल ल ल - ल ल ल - गा गा गा - ल गा गा - ल गा गा
खरे आहे मालिनी सारखे गोड वृत्त नाही. प्रत्येक आठव्या अक्षरावर येणारी यती हृदयात टिचकी वाजवते.... मला स्वतःला ह्या वृत्तात कधी लिहिता नाही आले, तरी बहुतेक वेळी हेच वृत्त तोंडात घोळत असतं.

   कणभर उरलेले रूप माझे उरी घे
   मधुतर जळवंती हात माझे करी घे
   तनुभर जमलेली रात्र घे ना मिठीला
   क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला
     - ग्रेस

आपला,
(वृत्त छंदी) विशुभाऊ

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

सध्या ती काय करते ?

बायकोने विचारले सध्या ती काय करते बघायचं का?
मी फेसबुकचे प्रोफाइल बघून चटकन सांगितले की ती जपानला असते....

'मी सध्या उपाशी आहे !'

आपला,
(बिचारा) विशुभाऊ

बुधवार, ४ जानेवारी, २०१७

मी कावेखोर

झालेल्या प्रत्येक प्रकरणात जात किंवा धर्म बघण्याची काय गरज कोणास ठाऊक?
मुळात जाती धर्माची माझी पहिली ओळख हि शालेय पुस्तकात प.पु. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचताना झाली... तेव्हा वाटले जातीव्यवस्था तेव्हा होती आता नाही कारण माझ्या दैनंदिन जीवनात आजू बाजूला मी कधीच जात पात पहिले नव्हते (सुदैवाने मी सुशिक्षित घरातला आणि सामाजिक वातावरणातला नुसत्या शिक्षित नव्हे).... नंतर कालांतराने मला कळले की मी हिंदू आहे... आता ह्या गोष्टीचा गर्व वाटावा असे काही मी केले नव्हते किंवा लाज वाटावे असे काही पातक केले नव्हते... तरी उगाच जाती धर्माचा गर्व ठासवण्याचा समाजाचा प्रयत्न मी पाहात होतो आणि अलिप्त पणे वागत होतो... सुसंस्कृत सुशिक्षित संस्कार दुसरे काय?
मी मैत्री करताना ना कधी जात बघितली ना कधी धर्म त्या मुळे माझ्या मित्रपरिवारात फक्त आणि फक्त मित्रच आहेत... असे मला काल पर्यंत वाटत होते.... पण काल बी ग्रेडी लोकांनी केलेल्या प्रकरणाचा जेव्हा मी निषेध नोंदवत होतो तेव्हा मला कळले की मित्रपरिवारात मी 'चांद्रसेनिय कायस्थ प्रभू' आहे.....
असो तर मुद्दा असा होता की मी राजसंन्यास वाचलेले नाही त्या मुळे मुळात राम गणेश गडकार्यांनी त्यात काय मुक्ताफळे उधळली आहेत माहित नाहीत आणि उधळली असली तरी ती काय संदर्भात आहेत ते हि  माहित नाही... पण मुळात छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी हाल हाल करून मारले तो औरंग्या शांतपणे त्याच्या कबरीत झोपलेला असताना तुम्ही नुसता हा पुतळा उखडून नक्की काय उखाडलेत?
तर सांगणे एवढेच...
'पुतळे उपटण्या पलीकडे प्रमुख कार्य करून दाखवा आणि पुरुषार्थ सांगा'
आपला,
(बामणी कावी) विशुभाऊ

सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

सर्वधर्म समभाव

चार दिवसां पूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या टूरवर जाण्या आधी माझे आणि बायकोचे सर्वधर्म समभाव ह्या विषयावर सखोल चर्चा झाली आणि असे ठरले की ह्याचे संस्कार मुलीवर ह्या वया पासूनच होणे गरजेचे आहे....
काल २५ तारखेला जेव्हा मी घरी आलो तेव्हा रात्री मला श्रीखंड पुरीचे जेवण वाढल्याने मला धक्काच बसला.... बाळ येशू ख्रिस्ता समोर दाखवलेला श्रीखंड पुरीचा नैवेद्य असे दृश्य डोळ्या समोर झळकले.... रमजान महिन्यात अल्ला नामाचे सहस्रवर्तन सोहळा दिसायला लागला......
माझा तो चेहरा बघून बायको बोलली खालच्या मजल्यावरच्या पिंकीचे लग्न जमले म्हणून आज केळवण केले.... आणि माझा चेहऱ्यावरचा बुद्ध हसला...

आपला,
(शेकुलर) विशुभाऊ

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

काल एका गृहस्थांनी माझी जात विचारली.... म्हणजे त्याचे झाले असे, बऱ्याच गप्पा झाल्यावर मला विचारले "तुम्ही रणदिवे म्हणजे??"... आमच्या पिढ्या ह्या जाती व्यवस्था मोडण्यात गेल्या त्या मुळे ह्या प्रश्नांने मला चीड येणे स्वाभाविकच होते पण समोरील व्यक्तीच्या वयाचा आदर ठेवून म्हटले "संख्यायन गोत्री रणदिवे कुलावंत देशपांडे उपाधिपती चांद्रसेनिय कायस्थ प्रभू !"... त्यांचा गंडलेला चेहरा पाहून मला हसू आले पण त्या चिवट व्यक्तीने पुढचा प्रश्न टाकला "म्हणजे नक्की कोणात मोडता?"..... म्हटले काही लोकांचे मेंदू डोक्यात असतात तर काहींचे गुढग्यात, आमचे पोटात असतात... आम्ही पोटाने विचार करतो तर आता तुम्हीच ठरवा आम्ही कोणात मोडतो ते !
#ProudCKP

रविवार, ८ मार्च, २०१५

वाडा चिरेबंदी

एखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव तोडणारी किंवा परके पणाची भावना देणारी असते. एकदाका मनुष्य आपले घर सोडून दुसरी कडे संसार थाटून राहिला कि तो आपल्या मूळ घराला पाहुणाच होतो ; मग मनुष्य म्हणजे त्या घरची लाडकी लेक असो कि वंशाचा दिवा.
माणसाच्या कौटुंबिक स्वभावावर, काळा प्रमाणे भावंडांच्या स्वभावात आलेल्या कटुतेवर, अप्पलपोटी पणावर तसेच एकाच जातीतल्या पण वेगळ्या पोट जातीतील हेवे-दाव्यांवर केलेले स्पष्ट भाष्य म्हणजे महेश एलकुंचवार लिखित नाटक 'वाडा चिरेबंदी'. ह्या नाटकातली पात्रं समोरच्या अंधारात क्षुद्र स्वार्थ जपताहेत, पण त्याचवेळी त्यांचा जीव परस्परांसाठी तुटतोही आहे. आतडं सोडवून घेता घेता ते अधिकच गुंतत जातं आणि ह्या सगळ्याच्या तळाशी असते नितळ माणुसकी! ह्या नाटकातून उमजलेलं मानवी जीवनातलं हे सत्य रसिकांना अंतर्मुख करतं आणि स्वतःचं प्रतिबिंब त्यात दिसतं. वऱ्हाडी संस्कृती मध्ये ३०-३५ वर्षां पूर्वी लिहिलेले हे नाटक आजही सर्व ठिकाणी लागू होते. काळानुरूप माणसाच्या गरजा बदलतात, वेशभूषा बदलते, भाषा बदलते पण स्वभाव बदलत नाही.

१ मे १९८५ रोजी कालभैरव या संस्थेने दादर मधल्या शिवाजी मंदिर येथे ह्या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. विजया मेहता यांनी ते दिग्दर्शित केले होते. त्यानंतर महेश एलकुंचवार यांनी त्याचे पुढचे दोन भाग ‘युगांत’ आणि ‘भग्न तळ्याकाठी’ लिहिले. १९९४ मध्ये या दोन भागांसह ‘वाडा चिरेबंदी’ या तिन्ही नाटकांचा ९ तासांचा एकत्रित प्रयोग ‘त्रिनाट्यधारा’ नावाने गाजला. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केले होते. आता यातील पहिला भाग म्हणजे नाटक ‘वाडा चिरेबंदी’ पुन्हा 'अष्टविनायक' आणि 'जिगीषा' या दोन नाट्यसंस्थांकरवी व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे.
नक्कीच पहावे आणि अनुभवावे असे हे दोन अंकी नाटक संग्रहित करण्या योग्य सुध्दा आहे.

आपला,
(रसिक) विशुभाऊ

पुस्तकवाले डॉट कॉम वर पुस्तक रूपात नाटक उपलब्ध आहे.

रविवार, १ मार्च, २०१५

नर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय

भारतवर्षातील अनेक नद्यां पैकी नर्मदा नदी हि अशी एकमेव नदी आहे जिची अनेक शतकानुशाताकांपासून विधीपूर्वक परिक्रमा केली जाते. नर्मदा परिक्रमा अतिशय खडतर तीनहजार किलोमीटर अंतर असलेली परिक्रमा आहे. हिमालयात जसे अनेक योगी, संत, समाधी अवस्थेत साधना करतात आणि त्यांचे अनुभव सर्वज्ञात आहेत, तसेच नर्मदेच्या परिसरात अनेक साधकांना योग्यांचा आणि ऋषीतुल्यांचा साक्षात्कार तसेच दर्शन झाले आहे.

परिक्रमेची सुरुवात नर्मदेचा उगम असलेल्या अमरकंटक येथून परंपरे प्रमाणे केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला नेमावर किंवा ॐकारेश्वर येथून सुध्दा सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेचा साधा ओघळ सुध्दा ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणार्या नद्या ओलांडलेल्या चालतात. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी असा संकेत आहे. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत 'ॐ नर्मदे हर' या मंत्राचा जप व नामस्मरण करायचे असते.

परिक्रमेदरम्यान आयुष्‍य 'सूर्योदय ते सूर्यास्त' व 'सूर्यास्त ते सुर्योदय' या दोन काळांमध्ये विभागले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्‍या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही. 

मराठी भाषेत नर्मदे परिक्रमेवर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. गो.नी. दांडेकरांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा' व 'नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा', धृव भट्ट यांनी लिहिलेले 'तत्वमसि', जगन्नाथ कुंटे ह्यांचे 'नर्मदे ऽऽ हर हर', रघुनाथ रामचंद्र गुण्ये ह्यांचे 'नर्मदे हर'. ह्या पैकी जगन्नाथ कुंटे ह्यांचे 'नर्मदे ऽऽ हर हर' वाचणे म्हणजे निव्वळ परिक्रमा करण्याचा मिळणारा अनुभव.

जगन्नाथ कुंटे ह्यांची लिखाणशैली वाचकाला नर्मदा परिक्रमेवर घेऊन जाते. त्यांचे अनुभव, त्यांना दिसणारी दृश्ये हि अक्षरशः वाचकाला दिसू लागतात. त्यांची लिखाणातील म्हणा किंवा मूळ स्वभावातील म्हणा विनोदी आणि मनमौजी छटा अध्यात्माचे रटाळ किंवा कोरडे फटके न वाटता प्रेमळ अनुभव देतो. त्यांची आपल्या सद्गुरु वरील श्रद्धा आणि नर्मदा माते वरील भक्ती आणि ह्या जोरावर पूर्ण केलेली खडतर परिक्रमा व त्यात आलेले अनन्यसाधारण अनुभव म्हणजे त्यांचे पुस्तक 'नर्मदे ऽऽ हर हर'.

पुस्तकाची सुरवात हि रटाळ प्रस्तावनेने न होता परिक्रमेच्या मजेदार अनुभव साराशांने होते, जसे परिक्रमा चालू केल्यावर लेखकाला समजलेल्या गोष्टी त्यांनी इथे सांगितल्या आहेत " परिक्रमेत मीठ ह्या खारट पदार्थाला 'रामरस' म्हणतात; चावलराम; दालराम; सब्जीराम; चपातीराम अशी जेवण्याच्या पदार्थाला 'राम' लावण्याची पध्दत.… ". पायी परिक्रमा करणाऱ्या लेखकाचा काटकपणा, अगदी कमी आहार, पराकोटीची सहनशीलता, त्यांची चालण्याची गती ह्या साऱ्या वर्णनात वाचक गुंतून, गुंगून समरस होऊन जातो. मनातल्या क्षणिक इच्छांची पूर्तता किंवा अडचणींचे निवारण आपोआपच होण्याचे प्रसंग वाचताना अचंबित व्हायला होते. नर्मदा परिसर, त्या काठावरचे भिल्ल - आदिवासी, अनेक गावांची, प्रदेशांची नावे इत्यादी भौगोलिक माहिती या पुस्तकातून सुंदर मांडली आहे. तिन्ही परिक्रमांमध्ये शूलपाणीच्या भयंकर जंगलातून लेखकाने केलेला प्रवास व त्यातले अनुभव विलक्षण आहेत. दिंडोरी वरून एका विराण ठिकाणावर अचानक दिसलेली दगडी वास्तू , त्यातील तीन साधू , त्यांनी दिलेला वाफाळलेला चहा आणि तो डोळे मिटून पिताना क्षणार्धात सर्व अदृश्‍य होणे आणि हातात फक्त चहाचा रिकामा ग्लास; नर्मदेच्या प्रवाहातून पुजेची पोहोच म्हणून मोतीचुराच्या लाडवांची टोपली घेऊन येणारी व्यक्ती व तिचे अदृश्‍य होणे यासारखे अनेक अद्‌भुत अनुभव वाचकाला खिळवून ठेवतात.

जगन्नाथ कुंटे यांनी पुस्तकात वर्णन केलेले काही प्रसंग विलक्षण गूढ आणि अनाकलनीय आहेत, घडलेल्या गोष्टींवर जर विश्वास ठेवला तर खरच अतर्कनीय आणि अचंभित अवस्थेत वाचक जातो. उदाहरणार्थ, 'तिसर्या परिक्रमेत त्यांना झालेले अश्वस्थामाचे दर्शन', 'एकदा नदी पार करताना छोट्या मुलीच्या रूपात प्रत्यक्ष नर्मदामाईने दिलेले दर्शन'. तसेच, पुण्यात आल्यावर परिक्रमा पूर्ण झाल्याचा आणि नर्मदा मातेने पूजा स्वीकारल्याचा प्रत्यय म्हणून वृद्ध व्यक्तीच्या रूपात पुन्हा नर्मदामाईने दर्शन दिल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला आहे.

पुस्तका मध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा रंगलेल्या आहेत, तरी त्यात मनाला भावणारी व्यक्ती म्हणजे कुंतल चटर्जी. जगन्नाथाजी यांच्या प्रवासात बरच काळ कुंतल या बंगाली तरुण साधूने सोबत केलेली आहे. सधन घरातला एकुलता एक लाडात वाढलेला उच्चशिक्षित पण शांतीच्या शोधात सर्वत्याग करून घराबाहेर पडलेला कुंतल वाचताना खूप भावतो व आपण किती क्षुद्र वासनेच्या आहारी आहोत ह्याची जाणीव करून देतो.

शूलपाणीच्या जंगलातील अनुभव वर्णन फार सुंदर आहे. हे जंगल मामांकडून लुटले जाण्यासाठी प्रसिध्द आहे. हे मामा म्हणजे काय ते लेखकानेच पुस्तकात फार सुंदर शब्दात सांगितले आहे " शूलपाणीच्या जंगलात पहिल्याच दिवशी एक भिल्ल जमात तुम्हाला लुटते. 'नर्मदापुराणा'त त्यांना 'नर्मदेचे भाऊ' म्हटले आहे. म्हणून त्यांना 'मामा' म्हणतात. ते लुटतात आणि आपण लुटून घ्यायचे. जन्मभर हे माझे, हे माझे करून आपण आसक्तीने वस्तू जमा करतो. ती आसक्ती सुटावी हा लुटण्याचा मुख्य हेतू. हेतू चांगलाच आहे. लुटणारा आणि लुटून घेणारा दोघेही भाग्यवान. सुखी जीव."  पहिल्या परिक्रमेतला लेखकाचा शूलपाणी मधला अनुभव रोमांचकारी आणि विनोदी दोन्ही आहे. मामांनी लुटल्यावर जगन्नाथजी ह्यांच्या कडे देव आणि अंगावर लंगोट एवढेच राहिले होते. 

लेखकाने शक्तीपाताची दीक्षा घेतलेली असल्याने साधना करताना कुंडलिनीच्या क्रिया व त्या मुळे होणारी योगासने व ती पाहून अनेक लोकांनी त्यांच्या कडून दीक्षा मिळवण्या साठी केलेला खटाटोप. भावनेच्या भरात दुष्काळी गावाला दिलेला पावसाचा आशीर्वाद खरा होणे व त्यामुळे लोकांची झालेली वाचासिद्धीची समजूत. अश्या अनेक चमत्कारीत गोष्टी वाचताना आश्चर्य वाटते पण तरी लेखक त्यात स्वतःला काहीही लौकिक देत नाही. 

लेखक जगन्नाथ कुंटे हे लहानपाणा पासून अध्यात्मिक प्रवृत्तीचे. वयाच्या दहाव्या वर्षी जेव्हा सर्वसाधारण मुलं खेळण्यात रमलेली असतात तेव्हा हे हिमालयात निघून घेले होते. संसारात असतानाही साधने साठी ह्यांची भटकंती चालू. साधनेत असताना किंवा परिक्रमेत असताना घराची, बायको-मुलांची त्यांना आठवण नाही, ओढ नाही. जेव्हा साधनेची मस्ती उतरते तेव्हा एक सामान्य, अशिक्षित माणूस. सतत सिगरेट ओढतात, त्यामुळे अध्यात्मातला माणूस असेल असं सांगूनही खरं वाटणार नाही असे व्यक्तिमत्व. व्यावहारिक जगात सगळ्यांच्यात देव बघायची त्यांची वृत्ती पुस्तकातील वाक्यागणिक दिसून येते.

लेखका इतकच कौतुक वाटावं ते त्यांच्या पत्नी सौ. जानकी कुंटे यांचं. नवरा घरातून कधीही उठतो आणि ' निघालो' असं सांगतो, बायकोला नमस्कार करतो आणि हिमालयात किंवा नर्मदा परिक्रमा करून ३-४ वर्षांनी घरी परत येतो. तरी ह्या माऊलीची ह्याबद्दल कुठेही तक्रार नाही कि कटकट नाही. संपूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर घेऊन ह्या मातेनी संसारात राहून केलेली 'साधना' खरोखर महान आहे. हि तीच माता जिने भटकंती करणारा संन्यासी प्रवृत्तीचा नवरा असताना 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे अप्रतिम पुस्तक लिहिणारा लेखक घडवला.

'नर्मदे ऽऽ हर हर' हे पुस्तक म्हणजे धार्मिकतेचा किंवा अध्यात्मिकतेचा बाऊ करणारे नसून धर्माची दुकानदारी आणि बुवाबाजीची फसवेगिरी ह्यावर फटकेबाजी करणारे सुध्दा आहे. ह्या पुस्तकाचे लिखाण एकसुरी नसून बहुमितीय आहे. ह्या पुस्तकात मेधाताई पाटकरांच्या कार्याबद्दल देखील तळमळीने लिहिले आहे. स्वतःला संन्यासी म्हणवणाऱ्या तामसी प्रवृत्तीच्या लोकांवर कोरडे ओढले आहेत आणि त्याच वेळी 'चमत्कार' वाटावा असे अनुभव सहजतेने सांगितले आहेत. एका झपाटलेल्या नर्मदा परीक्रमेचे हे कथन नक्कीच वाचनीय आणि संग्रहित करण्यायोग्य आहे.

आपला,
(परिक्रमावासी) विशुभाऊ रणदिवे 

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

चालता चालता

काही तरी वेगळं वाटतं आहे....  हां पाठीवरची लॅपटॉपची बॅग आज हालकी वाटते आहे.... पण आजून काही तरी.... असे कसे आज मी चालत का जात आहे ऑफिसला?.... आज घरून निघताना मी देवाला नमस्कार केला कि नाही?.... हं बरोबर बायकोने काहीतरी कारणाने देव पाण्यात ठेवले आहेत काही दिवस.... आठवत नाही असो.... उशीर झाला आहे, इतके दिवस त्या सोलुशन वर काम करतो आहे आणि आज प्रेझेन्टेशन आहे.... चल धाव नाहीतर ऑर्डर जायची हातची.... च्याला माझ्या कार सारखीच कार गेली ही, माझीच होती वाटतं.... मी का चालत जातो आहे?
तीन हात नाका गेला नाहूर गेले आणि गांधी नगरचा टर्न घेतल्यावर परत तीन हात नाका कसा आला?.... अबे धाव मोठे प्रोजेक्ट आहे, घालवशील हातचे.... हि ऑफिस ची बिल्डींग नाही वाटत.... ब्रिज कॅन्डी ला कसा आलो?.... अरे स्ट्रेचर वरून का नेत आहेत?.... असा काय बोलतो आहे हा डॉक्टर...."AVM मुळे केमिकल लोचा झाला आहे मेंदूत.... हा हा हा".... मी पळतो आहे.... 
"याद करो वोह बाबरी मज्झिद वो गुजरात के दंगे!".... "हमने सबको संभाला, अब हमपे उंगली उठाओगे तो हात काट देंगे!".... दंगल होणार वाटतं !!!
राष्ट्रगीत चालू आहे म्हणून मी सावधान मध्ये उभा आहे आणि हा साला मादर** बागडतो आहे.... साली काय लोकं आहेत राष्ट्राचा आपमान म्हणुन मी त्याला मारतो आहे तर हे मला लांब नेत आहेत....
सिटी क्लॉक मध्ये १२चे ठोके!!! धाव पळ उशीर झाला.... अरे आधी कधी सिटी क्लॉक ऐकले नव्हते.... धाड!!! आपटलो बॅनरवर.... लावले भें** वाढदिवसाचे बॅनर!!!!
आरे आज इन्शुरन्स चे प्रिमियम पण भरायचे आहे नाहीतर बायको मुलीला काही मिळायचे नाही.... तसे बॅंकमध्ये पैसे आहेत, पण किती दिवस पुरणार??? शिक्षण खूपच महाग झाले आहे , आमच्या वेळी.... हा हा हा म्हातारा झालो की , 'आमच्या वेळी' असे बोलायला लागलो....
ही लोकं आशी छदमी का हसत आहेत माझ्या कडे पाहून?.... हो बरीच कामे आर्धवट ठेवली आहेत.... पुस्तक पूर्ण होईल कि नाही माहीत नाही....
व्वा सुंदर मैदान आहे हे.... माझ्या लहानपणी आई बाबा अश्याच मैदानात मला खेळायला घेऊन यायचे, आता मला मुलीला खेळायला नेण्यासाठी न मैदान ना वेळ.... माझ्या लाइफ सायंस च्या प्रोजेक्ट साठी छान जागा आहे ही....
धाव बेटा धाव प्रेझेण्टेश्न आहे !!.... काय खड्डे आहेत हे.... पडलोच.... आरे ह्या गाड्या अंगावरून जात आहेत पण एवढे छान का वाटते आहे?.... काय सुंदर प्रकाश आहे पांढरा.... हे काय आले माझे ऑफिस.... आज सगळे काम सोडून माझ्या केबिन मध्ये का उभे आहेत ??? एवढे शांत !!!! .... 
!!!!माझ्या तसबिरीला चंदनाचा हार !!!!


आपला,
(गेलेला) विशुभाऊ

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

चिऊ आणि बाहुली

संध्याकाळी ५ वाजताच आभाळ दाटून आल्या मुळे काळोख झाला होता. तीन तासात अहमदाबादला जाणारी फ्लाईट होती आणि माझे आजून पॅकींगच चालू होते. घरात माझी धावपळ चालू होती आणि चिऊ शांत पणे तिची बाहुली मांडीवर घेऊन तिच्याशी खेळत होती. चिऊ ची आई तीन दिवसान पूर्वीच अमेरिकेच्या टूर वर गेलेली होती आणि आज मी सेल्स कॉल साठी २ दिवस अहमदाबादला चाललो होतो. हि मला डायरेक्ट अहमदाबादलाच भेटणार होती आणि तेथून आम्ही देघे एकत्र मुंबईत परत येणार होतो.
शाळेची भरलेली बॅग त्या बाजूला दोन दिवसांची कपड्यांची बॅग आणि त्या बाजूला इवलीशी ४ वर्षांची चिऊ तिच्या बाहुलीशी तिची आई होऊन खेळत होती तिला समजवत होती तिला रागे भरत होती. तिचा तो खेळ बघून मी तिला जवळ घेतले आणि गालावर एक छान मुका दिला तर तिने लगेच तिच्या बाहुलीला तसाच एक मुका दिला. मी म्हटले "चिऊ मी आणि मम्मा दोन दिवसांनी येऊ तर तू आजी आज्जू कडे शहाण्या सारखी राहा वेडे पणा करू नको !". तिने मानेनेच 'हो' म्हटले, आणि मला तिचे भरून आलेले डोळे सुध्दा दिसले पण माझा नाईलाज होता. तिन ब्लु चिप्स कॉल्स त्यात एक जवळ जवळ कन्फॉर्म ऑर्डर आणि खरे सांगायचे तर मी खूप एक्साईटेड होतो.
मी उठून बॅग घेतली आणि चिऊ ला घेण्या साठी गेलो तर ती तिच्या बाहुलीला सांगत होती "मम्मा २ दिवसांनी येणार शहाण्या सारखी राहा वेडे पणा करू नको...", आणि तिने बाहुली घरात तिच्या खुर्ची वर ठेवली. मी तिला म्हटले "आगं बाहुली घे ना ती एकटी कशी राहील ?"
तर चिऊ म्हणाली "मी राहते ना !!!"
बाहेर कडाडून वीज कोसळली आणि आभाळ फुटावं तसा पाऊस कोसळू लागला ....

आपला,
(?) विशुभाऊ

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

उत्तुंग सेनानी

आज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते. तरी बरं चपलेच्या किमती वाढलेल्या नाहीत.
मी उगाच म्हटलं "माळा कसल्या घालता उडवा त्याला"…. तर एका पोलिसाने मला बाजूला घेतलं आणि उगाच नसत्या चौकश्या करायला लागला. 'नाव काय?' 'गाव काय?' 'फुल काय?' 'फळ काय?'…
तेथून चक्क मला पोलिस स्टेशन मध्ये घेऊन गेला. आता हा त्याचा वरचा अधिकारी असेल, त्याने मला 'उडवायचा' प्लॅन काय असे विचारले. मी खुश होऊन लगेच एक झ्याक पैकी प्लॅन बनवला आणि सांगून टाकला. आता तर हे सगळे एकमेकां कडे पाहून नेत्र संकेत करू लागले.
पोलिस स्टेशनातून हि लोकं मला चक्क सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेऊन आले. कदाचित मिशन पूर्ण करण्या साठी शारीरिक दृष्ट्या मी व्यवस्थित आहे कि नाही ते तपासायचे असावे.
मग तेथून मला ३ हात नाका येथील त्यांच्या एका गुप्त ठिकाणी घेऊन आले. मला इतके वर्ष उगाच वाटत होतं तिथे वेड्यांचे इस्पितळ आहे, पण सत्यात ह्या स्वातंत्र सेनानींचे गुप्त ठिकाण निघाले. मग तिथे त्यांचा एक नेता आला, जरा विचित्रच होता तो. साध्या कपड्यांवर पांढरा शर्ट घातला होता त्याने. आम्ही खूप गप्पा मारल्या वेगवेगळ्या विषयांवर अगदी माझा प्लॅन पासुन काश्मिर प्रश्न ते अखंड हिंदुस्तान पर्यंत.
नंतर त्यांनी मला पण एक पांढरा झगा घालायला लावला आणि वेगळ्याच प्रकारच्या चाचण्या केल्या, कदाचित मिशन आधीच्या फॉर्म्यालिटीज असाव्यात.
मग मला माझे घरचे नेण्यासाठी तेथे आले. त्यांच्या हातात औषधाची लिस्ट होती आणि माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी.

बघितलं डोळ्यात पाणी आणायला नेहमी कांदाच पाहिजे असे नाही …

आपला,
(कोणाचा?) विशुभाऊ

शुक्रवार, २४ मे, २०१३

सोनेरी टोळी

Soneri Toli
'सोनेरी टोळी' हि १९१५ साली नाथमधवांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे एका नैतिक तत्वांवर चालणाऱ्या पण परिस्थितीमुळे आड मार्गाने पैसा कमावणाऱ्या १२  भामट्यांची कथा. हि कादंबरी एक शतक जुनी असली तरी त्यातले अनेक सामाजिक संबंध आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात.
मुंबई मध्ये एका चाळीत बिऱ्हाड असलेल्या १२ मित्रांची सद्मार्गाने पैसे कमावण्याची सर्व दारे जेव्हा बंद होतात, तेव्हा अनैतिक पद्धतीने कमावणाऱ्या पण उजळ माथ्याने फिरणाऱ्या समाज घटकांना अद्दल शिकवण्या साठी हि लोकं एक टोळी स्थापन करतात तीच टोळी म्हणजे 'रायक्लब' उर्फ 'सोनेरी टोळी'. अनेक शकला लढवून लोकांना टोप्या घालणारे त्यांचे किस्से वाचताना खूप मौज वाटते आणि हसायला सुध्दा येतं.
तत्कालीन आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सुध्दा छान प्रकारे प्रकाश पाडला आहे. त्यावेळी समाजात असलेल्या जाती भेद, स्त्री शिक्षण आणि विधवा पुनःविवाह इत्यादी विषयांवर सुध्दा परखड भाष्य केलेले आहे, भले ते आपल्याला आता ते मुळीच रुचत नसले तरी त्यावेळची जन मानसिकता समजते.
१९ व्या व २० व्या शतका मध्ये अनेक सुन्दर सहित्य निर्माण झाले आणि ते आता लुप्त होण्याच्या मर्गावर आहे, तरी ते वाचताना एक गोष्ट प्रखरतेने जाणवते ती म्हणजे आपण त्या नंतर अजून पर्यंत साहित्यात काहीच प्रगती केलेली नाही. हे जुने साहित्य पुनः उपलब्ध करून दिल्याबद्दल 'समन्वय प्रकाशन' चे मनापासून आभार.
आपला,
(वाचक) विशुभाऊ

रविवार, ७ एप्रिल, २०१३

भुताटकी - भाग २

ही २००५ मधली गोष्ट आहे. इंजिनीअरींग साठी पुण्याला (निगडी प्राधीकरण) मध्ये रहात होतो. इंजिनीअरींगचे शेवटचे वर्ष होतं, आणि पेईंग गेस्ट म्हणून जे घर मिळाले होतं ते जरा भारलेलं होतं. रोज रात्री २.३० वाजता पलंग एकदा थरथरायचा. पण नंतर त्या गोष्टीची इतकी सवय झाली की 'अलार्म' असावा ह्या पध्दतीने मी घ्यायला लागलो.
माझे घर कॉलेजला लागून असल्याने परिक्षेच्या वेळी बरीच मित्र मंडळी माझ्या रूमवर अभ्यास करायला असायची. सातवी सेमिस्टर होती, सगळे मरमरून अभ्यास करत होते. रात्री नेहमी प्रमाणे पलंग हालल्यावर (आता पर्यंत सगळ्यांना ह्याची सवय झाली होती) आम्ही ठरवले की भक्ती शक्ती समोरच्या जकात नाक्यावर बुर्जी पाव वगैरे खाऊन येऊ. आमच्यातला उज्वल नावाचा मित्र म्हणाला 'माझे नोटस काढून होतच आहेत, तुम्ही पुढे व्हा मी येतो मागून पळत'......
आम्ही जकात नाक्यावर बुर्जी पाव खाऊन, चहा सिगारेट मारून निघालो तरी उज्वल काही आला नाही. आम्ही त्याच्या नावाने शंक करत घरा जवळ पोहचतोच तर हा गेटच्या बाहेर झोपलेला/बेशुध्द दिसला. उठता उठेना, शेवटी काकूंना (घर मालकीण) ऊठवले आणि त्यांना सांगितले. त्या आम्हाला ओरडल्या की 'रात्रि गेटच्या बाहेर जायचे नाही सांगितले होते ना!!' आणि त्यांनी उज्वल वरून तांदूळ उतरवले तेव्हा त्याला शुध्द आली. त्याला विचारले काय झाले बाहेर बेशुध्द कसा पडलास??? तेव्हा त्याने घडलेली गोष्ट पुढील प्रमाणे सांगितली.....
"तुम्ही निघाल्यावर अगदी ३-४ मिनिटां मध्ये मी पण निघालो. गेट मधून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही चालताना दिसत होतात. इतक्यात माझा हात कोणी तरी पकडला म्हणून पाहिले तर ती बिना मुंडक्याची बाई (ही बिना मुंडक्याची बाई फेमस होती, आणि बर्याच जणांनी पाहिलेली होती) मी ओरडण्याचा प्रयत्न केला ...... आणि आता शुध्दीवर आलो"

रविवार, ३ मार्च, २०१३

कोल्हापुर भाग १

"नाद नाय करायचा" हे सांगणारे कोल्हापुरी लोकं म्हणजे भूतलावरची सगळ्यात नादखुळी माणसं. आयुष्यात एकदा तरी आखाड्यात लालबुंद झालेला, मटण रस्सा बियर सारखा होरपणारा आणि बियर चे ग्लास एक मेकांवर आपटतांना 'चियर्स' ऐवजी 'चांग भले' ओरडणारा कोल्हापुरी माणूस म्हणजे एक अजीबच रसायन आहे.
माझ्या करिअरची पहिली प्रोजेक्ट असायन्मेंट हि कोल्हापुरातल्या घाटगे-पाटील इंडस्ट्री मधली. माझ्या बरोबरची पोरं प्रोजेक्ट साठी परदेशात गेली होती आणि मी कोल्हापूरला जाणार म्हणून थोडा हिर्मुसलोच होतो. माझ्या डोळ्यासमोर कोल्हापूर म्हणजे एक खेडेगाव जेथे कसल्याही शहरी सुविधा नाहीत वगैरे असे चित्र होतं. तिथे जाताना आपल्या ब्रॅन्डच्या सिगारेट पण मिळणारच नाहीत असे गृहीत धरून स्टॉक घेऊन गेलो होतो. आता कोल्हापूरला गेल्यावर निळू फुले सारखे जीप मधून फिरणारे व्हिलन, लावणीचे फड, अशोक सराफच्या हिरॉईन सारख्या दिसणाऱ्या घाटी बायका इत्यादी इत्यादी वर्षभर पहावयाचे असे मनोमनी खात्री करून मी महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये बसलो.
भल्या पहाटे मी कोल्हापूर स्टेशनवर पोहचलो. इतक्या तासांच्या प्रवासा मध्ये सिगारेटची तल्लफ भागवायला चान्स मिळाला नव्हता, म्हणून बाहेरील चहा टपरीवर सिगारेट सुलगावून चहाचा घोट घेतला. त्या कोपर्यावरच्या काळपट टपरीवर एवढा अस्सल दुधाचा चहा मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते, कोल्हापूरने पहिल्याच भेटीत मला इथल्या चहाच्या प्रेमात पाडले. मी अगदी मनोसोक्त प्रतिसाद देण्या साठी टपरीवाल्याला म्हटले "कोल्हापुरातला पहिलाच चहा एकदम फक्कड पाजलात भाऊ!" , त्यावर त्या पेहलवान चहावाल्याने मिशीच्या पडद्या मागून हसून माझ्या पाठीत गुद्दा हाणून म्हटले "नाद नाय करायचा पाहुणं!"
कोल्हापूर मध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास असल्याने इथे कसलीच कमी नाही. महिना ५ लाख कामावणारा आणि महिना ५ हजार कामावणारा दोन्ही तेवढेच समाधानी आणि ऐटबाज दिसतात. दिवस असो रात्र असो, सकाळचे पाच वाजलेले असो कि दुपारचे बारा किंवा संध्याकाळचे सात, इथला माणूस भेटताच पहिला प्रश्न विचारतो 'जेवलास का?'. मुळात कोल्हापुरी मनुष्य हा जगण्यासाठी जेवत नाही तर जेवण्या साठी जगतो.
कोल्हापूरचा पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हा सर्वज्ञात आहे पण ह्या दोन रस्स्यांच्या पलीकडची गोष्ट म्हणजे 'रस्सा मंडळ'. रस्सा मंडळ हा कोल्हापूरच्या सार्वजनिक समाजाचा अविभाज्य घटक आहे. मुख्यत्वे बुधवारी संध्याकाळी १०-१५ मित्र एकत्र कुठल्यातरी नदीच्या किंवा तलावाच्या काठी उदाहरणार्थ पंचगंगा किंवा रंकाळा इथे भेटतात आणि वर्गणी काढून विकत आणलेले मटण शिजवतात. प्रत्येकजण आपल्या घरून स्वतःची ताट, वाटी, आणि भाकर्या घेऊन येतात आणि गप्पा टप्पा करून रस्सा होरापून रात्री परत घरी. हो आणि कोल्हापुरी माणूस दिवसभर काही दिवे लावो पण रात्री घरीच जातो.
इथला शब्दकोश सुध्दा थोडा वेगळा आहे. 'फाळका टाकणे' म्हणजे भरपेट जेवण झाल्यावर पोटाचा पट्टा सैल करणे. शिडशिडीत अंगकाठीच्या मुलीला 'काटा ' मध्यम बांधेवालीला 'कंडा' आणि स्थूल मुलीला 'आयदान' असे म्हणतात. आज 'काटा किर' झाली म्हणजे आज जिंकलो. 'खटक्यावर बोट जागेवर पल्टी' म्हणजे एका हाती लढलो वगैरे वगैरे अशी बरीच उदाहरणे आहेत.
(क्रमशः)
आपला,
(नादाखुळा) विशुभाऊ

गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

शिवी

शिवी किंवा शिव्या ह्या शब्दशः जो घेतो त्याला त्या नक्कीच अश्लील वाटतात. पण काही वेळेला ज्या तिखट भावना व्यक्त करायला शब्द कमी पडतात तेव्हा शिव्याच कामी येतात. मंदारशेठ म्हणतात तसे 'भावना व्यक्त करायला जेव्हा ओव्या कमी पडतात... तेव्हाच शिव्या जन्म घेतात..'. शिवी हा भाषेचा एक सुंदर अलंकार आहे आणि तो योग्य वेळीच वापरायचा असतो.
मी स्वतः एकदा शिवी शब्दशः घेतली होती आणि फार मोठी गम्मत झाली होती. आमच्या कॉलेज मध्ये एक चटपटीत पोरगी होती. ती जेव्हा रस्त्यावरून चाले तेव्हा थोर योगी मुनी सुध्दा चळलतील असे ते लावण्य. मीच काय संपूर्ण कॉलेज तिच्यावर फिदा होतं. अगदी भावना जेव्हा असह्य झाल्या तेव्हा तिला मी भर वर्गात प्रपोज केले . तेव्हा ती म्हणाली "इफ यु डू इट अगेन , आय विल फक यु बास्टर्ड !". तिच्या ह्या वाक्यावर मी जाम खुश झालो आणि म्हणालो होतो "एनी टाईम एनी व्हेअर!!!" ........ तेव्हा तिच्या भावना समजण्याची अक्कल होती कुठे ??? मला माझ्याच भावना महत्वाच्या होत्या !!!
आपला,
(चळलेला) विशुभाऊ

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

माझे सिंगापुरायन

सुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर "माझे सिंगापुरायन" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुलकर यांच्या हस्ते चिपळूण येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात ई साहित्य प्रतिष्ठानच्या युनिट मध्ये झाले.
येथील तरुणाईचा जोश आणि जल्लोष बघून श्री तेंडुलकर म्हणाले," मुख्य संमेलनाहून मला हे युनिट अधिक आवडले". बस्स. thats it.
पुर्ण पुस्तक डाऊनलोड करण्या साठी ईथे >>क्लीक<< करा