हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, ३ मार्च, २०१३

कोल्हापुर भाग १

"नाद नाय करायचा" हे सांगणारे कोल्हापुरी लोकं म्हणजे भूतलावरची सगळ्यात नादखुळी माणसं. आयुष्यात एकदा तरी आखाड्यात लालबुंद झालेला, मटण रस्सा बियर सारखा होरपणारा आणि बियर चे ग्लास एक मेकांवर आपटतांना 'चियर्स' ऐवजी 'चांग भले' ओरडणारा कोल्हापुरी माणूस म्हणजे एक अजीबच रसायन आहे.
माझ्या करिअरची पहिली प्रोजेक्ट असायन्मेंट हि कोल्हापुरातल्या घाटगे-पाटील इंडस्ट्री मधली. माझ्या बरोबरची पोरं प्रोजेक्ट साठी परदेशात गेली होती आणि मी कोल्हापूरला जाणार म्हणून थोडा हिर्मुसलोच होतो. माझ्या डोळ्यासमोर कोल्हापूर म्हणजे एक खेडेगाव जेथे कसल्याही शहरी सुविधा नाहीत वगैरे असे चित्र होतं. तिथे जाताना आपल्या ब्रॅन्डच्या सिगारेट पण मिळणारच नाहीत असे गृहीत धरून स्टॉक घेऊन गेलो होतो. आता कोल्हापूरला गेल्यावर निळू फुले सारखे जीप मधून फिरणारे व्हिलन, लावणीचे फड, अशोक सराफच्या हिरॉईन सारख्या दिसणाऱ्या घाटी बायका इत्यादी इत्यादी वर्षभर पहावयाचे असे मनोमनी खात्री करून मी महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये बसलो.
भल्या पहाटे मी कोल्हापूर स्टेशनवर पोहचलो. इतक्या तासांच्या प्रवासा मध्ये सिगारेटची तल्लफ भागवायला चान्स मिळाला नव्हता, म्हणून बाहेरील चहा टपरीवर सिगारेट सुलगावून चहाचा घोट घेतला. त्या कोपर्यावरच्या काळपट टपरीवर एवढा अस्सल दुधाचा चहा मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते, कोल्हापूरने पहिल्याच भेटीत मला इथल्या चहाच्या प्रेमात पाडले. मी अगदी मनोसोक्त प्रतिसाद देण्या साठी टपरीवाल्याला म्हटले "कोल्हापुरातला पहिलाच चहा एकदम फक्कड पाजलात भाऊ!" , त्यावर त्या पेहलवान चहावाल्याने मिशीच्या पडद्या मागून हसून माझ्या पाठीत गुद्दा हाणून म्हटले "नाद नाय करायचा पाहुणं!"
कोल्हापूर मध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास असल्याने इथे कसलीच कमी नाही. महिना ५ लाख कामावणारा आणि महिना ५ हजार कामावणारा दोन्ही तेवढेच समाधानी आणि ऐटबाज दिसतात. दिवस असो रात्र असो, सकाळचे पाच वाजलेले असो कि दुपारचे बारा किंवा संध्याकाळचे सात, इथला माणूस भेटताच पहिला प्रश्न विचारतो 'जेवलास का?'. मुळात कोल्हापुरी मनुष्य हा जगण्यासाठी जेवत नाही तर जेवण्या साठी जगतो.
कोल्हापूरचा पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हा सर्वज्ञात आहे पण ह्या दोन रस्स्यांच्या पलीकडची गोष्ट म्हणजे 'रस्सा मंडळ'. रस्सा मंडळ हा कोल्हापूरच्या सार्वजनिक समाजाचा अविभाज्य घटक आहे. मुख्यत्वे बुधवारी संध्याकाळी १०-१५ मित्र एकत्र कुठल्यातरी नदीच्या किंवा तलावाच्या काठी उदाहरणार्थ पंचगंगा किंवा रंकाळा इथे भेटतात आणि वर्गणी काढून विकत आणलेले मटण शिजवतात. प्रत्येकजण आपल्या घरून स्वतःची ताट, वाटी, आणि भाकर्या घेऊन येतात आणि गप्पा टप्पा करून रस्सा होरापून रात्री परत घरी. हो आणि कोल्हापुरी माणूस दिवसभर काही दिवे लावो पण रात्री घरीच जातो.
इथला शब्दकोश सुध्दा थोडा वेगळा आहे. 'फाळका टाकणे' म्हणजे भरपेट जेवण झाल्यावर पोटाचा पट्टा सैल करणे. शिडशिडीत अंगकाठीच्या मुलीला 'काटा ' मध्यम बांधेवालीला 'कंडा' आणि स्थूल मुलीला 'आयदान' असे म्हणतात. आज 'काटा किर' झाली म्हणजे आज जिंकलो. 'खटक्यावर बोट जागेवर पल्टी' म्हणजे एका हाती लढलो वगैरे वगैरे अशी बरीच उदाहरणे आहेत.
(क्रमशः)
आपला,
(नादाखुळा) विशुभाऊ