हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

उत्तुंग सेनानी

आज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते. तरी बरं चपलेच्या किमती वाढलेल्या नाहीत.
मी उगाच म्हटलं "माळा कसल्या घालता उडवा त्याला"…. तर एका पोलिसाने मला बाजूला घेतलं आणि उगाच नसत्या चौकश्या करायला लागला. 'नाव काय?' 'गाव काय?' 'फुल काय?' 'फळ काय?'…
तेथून चक्क मला पोलिस स्टेशन मध्ये घेऊन गेला. आता हा त्याचा वरचा अधिकारी असेल, त्याने मला 'उडवायचा' प्लॅन काय असे विचारले. मी खुश होऊन लगेच एक झ्याक पैकी प्लॅन बनवला आणि सांगून टाकला. आता तर हे सगळे एकमेकां कडे पाहून नेत्र संकेत करू लागले.
पोलिस स्टेशनातून हि लोकं मला चक्क सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेऊन आले. कदाचित मिशन पूर्ण करण्या साठी शारीरिक दृष्ट्या मी व्यवस्थित आहे कि नाही ते तपासायचे असावे.
मग तेथून मला ३ हात नाका येथील त्यांच्या एका गुप्त ठिकाणी घेऊन आले. मला इतके वर्ष उगाच वाटत होतं तिथे वेड्यांचे इस्पितळ आहे, पण सत्यात ह्या स्वातंत्र सेनानींचे गुप्त ठिकाण निघाले. मग तिथे त्यांचा एक नेता आला, जरा विचित्रच होता तो. साध्या कपड्यांवर पांढरा शर्ट घातला होता त्याने. आम्ही खूप गप्पा मारल्या वेगवेगळ्या विषयांवर अगदी माझा प्लॅन पासुन काश्मिर प्रश्न ते अखंड हिंदुस्तान पर्यंत.
नंतर त्यांनी मला पण एक पांढरा झगा घालायला लावला आणि वेगळ्याच प्रकारच्या चाचण्या केल्या, कदाचित मिशन आधीच्या फॉर्म्यालिटीज असाव्यात.
मग मला माझे घरचे नेण्यासाठी तेथे आले. त्यांच्या हातात औषधाची लिस्ट होती आणि माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी.

बघितलं डोळ्यात पाणी आणायला नेहमी कांदाच पाहिजे असे नाही …

आपला,
(कोणाचा?) विशुभाऊ