हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

उत्तुंग सेनानी

आज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते. तरी बरं चपलेच्या किमती वाढलेल्या नाहीत.
मी उगाच म्हटलं "माळा कसल्या घालता उडवा त्याला"…. तर एका पोलिसाने मला बाजूला घेतलं आणि उगाच नसत्या चौकश्या करायला लागला. 'नाव काय?' 'गाव काय?' 'फुल काय?' 'फळ काय?'…
तेथून चक्क मला पोलिस स्टेशन मध्ये घेऊन गेला. आता हा त्याचा वरचा अधिकारी असेल, त्याने मला 'उडवायचा' प्लॅन काय असे विचारले. मी खुश होऊन लगेच एक झ्याक पैकी प्लॅन बनवला आणि सांगून टाकला. आता तर हे सगळे एकमेकां कडे पाहून नेत्र संकेत करू लागले.
पोलिस स्टेशनातून हि लोकं मला चक्क सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेऊन आले. कदाचित मिशन पूर्ण करण्या साठी शारीरिक दृष्ट्या मी व्यवस्थित आहे कि नाही ते तपासायचे असावे.
मग तेथून मला ३ हात नाका येथील त्यांच्या एका गुप्त ठिकाणी घेऊन आले. मला इतके वर्ष उगाच वाटत होतं तिथे वेड्यांचे इस्पितळ आहे, पण सत्यात ह्या स्वातंत्र सेनानींचे गुप्त ठिकाण निघाले. मग तिथे त्यांचा एक नेता आला, जरा विचित्रच होता तो. साध्या कपड्यांवर पांढरा शर्ट घातला होता त्याने. आम्ही खूप गप्पा मारल्या वेगवेगळ्या विषयांवर अगदी माझा प्लॅन पासुन काश्मिर प्रश्न ते अखंड हिंदुस्तान पर्यंत.
नंतर त्यांनी मला पण एक पांढरा झगा घालायला लावला आणि वेगळ्याच प्रकारच्या चाचण्या केल्या, कदाचित मिशन आधीच्या फॉर्म्यालिटीज असाव्यात.
मग मला माझे घरचे नेण्यासाठी तेथे आले. त्यांच्या हातात औषधाची लिस्ट होती आणि माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी.

बघितलं डोळ्यात पाणी आणायला नेहमी कांदाच पाहिजे असे नाही …

आपला,
(कोणाचा?) विशुभाऊ

शुक्रवार, २४ मे, २०१३

सोनेरी टोळी

Soneri Toli
'सोनेरी टोळी' हि १९१५ साली नाथमधवांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे एका नैतिक तत्वांवर चालणाऱ्या पण परिस्थितीमुळे आड मार्गाने पैसा कमावणाऱ्या १२  भामट्यांची कथा. हि कादंबरी एक शतक जुनी असली तरी त्यातले अनेक सामाजिक संबंध आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात.
मुंबई मध्ये एका चाळीत बिऱ्हाड असलेल्या १२ मित्रांची सद्मार्गाने पैसे कमावण्याची सर्व दारे जेव्हा बंद होतात, तेव्हा अनैतिक पद्धतीने कमावणाऱ्या पण उजळ माथ्याने फिरणाऱ्या समाज घटकांना अद्दल शिकवण्या साठी हि लोकं एक टोळी स्थापन करतात तीच टोळी म्हणजे 'रायक्लब' उर्फ 'सोनेरी टोळी'. अनेक शकला लढवून लोकांना टोप्या घालणारे त्यांचे किस्से वाचताना खूप मौज वाटते आणि हसायला सुध्दा येतं.
तत्कालीन आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सुध्दा छान प्रकारे प्रकाश पाडला आहे. त्यावेळी समाजात असलेल्या जाती भेद, स्त्री शिक्षण आणि विधवा पुनःविवाह इत्यादी विषयांवर सुध्दा परखड भाष्य केलेले आहे, भले ते आपल्याला आता ते मुळीच रुचत नसले तरी त्यावेळची जन मानसिकता समजते.
१९ व्या व २० व्या शतका मध्ये अनेक सुन्दर सहित्य निर्माण झाले आणि ते आता लुप्त होण्याच्या मर्गावर आहे, तरी ते वाचताना एक गोष्ट प्रखरतेने जाणवते ती म्हणजे आपण त्या नंतर अजून पर्यंत साहित्यात काहीच प्रगती केलेली नाही. हे जुने साहित्य पुनः उपलब्ध करून दिल्याबद्दल 'समन्वय प्रकाशन' चे मनापासून आभार.
आपला,
(वाचक) विशुभाऊ

रविवार, ७ एप्रिल, २०१३

भुताटकी - भाग २

ही २००५ मधली गोष्ट आहे. इंजिनीअरींग साठी पुण्याला (निगडी प्राधीकरण) मध्ये रहात होतो. इंजिनीअरींगचे शेवटचे वर्ष होतं, आणि पेईंग गेस्ट म्हणून जे घर मिळाले होतं ते जरा भारलेलं होतं. रोज रात्री २.३० वाजता पलंग एकदा थरथरायचा. पण नंतर त्या गोष्टीची इतकी सवय झाली की 'अलार्म' असावा ह्या पध्दतीने मी घ्यायला लागलो.
माझे घर कॉलेजला लागून असल्याने परिक्षेच्या वेळी बरीच मित्र मंडळी माझ्या रूमवर अभ्यास करायला असायची. सातवी सेमिस्टर होती, सगळे मरमरून अभ्यास करत होते. रात्री नेहमी प्रमाणे पलंग हालल्यावर (आता पर्यंत सगळ्यांना ह्याची सवय झाली होती) आम्ही ठरवले की भक्ती शक्ती समोरच्या जकात नाक्यावर बुर्जी पाव वगैरे खाऊन येऊ. आमच्यातला उज्वल नावाचा मित्र म्हणाला 'माझे नोटस काढून होतच आहेत, तुम्ही पुढे व्हा मी येतो मागून पळत'......
आम्ही जकात नाक्यावर बुर्जी पाव खाऊन, चहा सिगारेट मारून निघालो तरी उज्वल काही आला नाही. आम्ही त्याच्या नावाने शंक करत घरा जवळ पोहचतोच तर हा गेटच्या बाहेर झोपलेला/बेशुध्द दिसला. उठता उठेना, शेवटी काकूंना (घर मालकीण) ऊठवले आणि त्यांना सांगितले. त्या आम्हाला ओरडल्या की 'रात्रि गेटच्या बाहेर जायचे नाही सांगितले होते ना!!' आणि त्यांनी उज्वल वरून तांदूळ उतरवले तेव्हा त्याला शुध्द आली. त्याला विचारले काय झाले बाहेर बेशुध्द कसा पडलास??? तेव्हा त्याने घडलेली गोष्ट पुढील प्रमाणे सांगितली.....
"तुम्ही निघाल्यावर अगदी ३-४ मिनिटां मध्ये मी पण निघालो. गेट मधून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही चालताना दिसत होतात. इतक्यात माझा हात कोणी तरी पकडला म्हणून पाहिले तर ती बिना मुंडक्याची बाई (ही बिना मुंडक्याची बाई फेमस होती, आणि बर्याच जणांनी पाहिलेली होती) मी ओरडण्याचा प्रयत्न केला ...... आणि आता शुध्दीवर आलो"

रविवार, ३ मार्च, २०१३

कोल्हापुर भाग १

"नाद नाय करायचा" हे सांगणारे कोल्हापुरी लोकं म्हणजे भूतलावरची सगळ्यात नादखुळी माणसं. आयुष्यात एकदा तरी आखाड्यात लालबुंद झालेला, मटण रस्सा बियर सारखा होरपणारा आणि बियर चे ग्लास एक मेकांवर आपटतांना 'चियर्स' ऐवजी 'चांग भले' ओरडणारा कोल्हापुरी माणूस म्हणजे एक अजीबच रसायन आहे.
माझ्या करिअरची पहिली प्रोजेक्ट असायन्मेंट हि कोल्हापुरातल्या घाटगे-पाटील इंडस्ट्री मधली. माझ्या बरोबरची पोरं प्रोजेक्ट साठी परदेशात गेली होती आणि मी कोल्हापूरला जाणार म्हणून थोडा हिर्मुसलोच होतो. माझ्या डोळ्यासमोर कोल्हापूर म्हणजे एक खेडेगाव जेथे कसल्याही शहरी सुविधा नाहीत वगैरे असे चित्र होतं. तिथे जाताना आपल्या ब्रॅन्डच्या सिगारेट पण मिळणारच नाहीत असे गृहीत धरून स्टॉक घेऊन गेलो होतो. आता कोल्हापूरला गेल्यावर निळू फुले सारखे जीप मधून फिरणारे व्हिलन, लावणीचे फड, अशोक सराफच्या हिरॉईन सारख्या दिसणाऱ्या घाटी बायका इत्यादी इत्यादी वर्षभर पहावयाचे असे मनोमनी खात्री करून मी महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये बसलो.
भल्या पहाटे मी कोल्हापूर स्टेशनवर पोहचलो. इतक्या तासांच्या प्रवासा मध्ये सिगारेटची तल्लफ भागवायला चान्स मिळाला नव्हता, म्हणून बाहेरील चहा टपरीवर सिगारेट सुलगावून चहाचा घोट घेतला. त्या कोपर्यावरच्या काळपट टपरीवर एवढा अस्सल दुधाचा चहा मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते, कोल्हापूरने पहिल्याच भेटीत मला इथल्या चहाच्या प्रेमात पाडले. मी अगदी मनोसोक्त प्रतिसाद देण्या साठी टपरीवाल्याला म्हटले "कोल्हापुरातला पहिलाच चहा एकदम फक्कड पाजलात भाऊ!" , त्यावर त्या पेहलवान चहावाल्याने मिशीच्या पडद्या मागून हसून माझ्या पाठीत गुद्दा हाणून म्हटले "नाद नाय करायचा पाहुणं!"
कोल्हापूर मध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास असल्याने इथे कसलीच कमी नाही. महिना ५ लाख कामावणारा आणि महिना ५ हजार कामावणारा दोन्ही तेवढेच समाधानी आणि ऐटबाज दिसतात. दिवस असो रात्र असो, सकाळचे पाच वाजलेले असो कि दुपारचे बारा किंवा संध्याकाळचे सात, इथला माणूस भेटताच पहिला प्रश्न विचारतो 'जेवलास का?'. मुळात कोल्हापुरी मनुष्य हा जगण्यासाठी जेवत नाही तर जेवण्या साठी जगतो.
कोल्हापूरचा पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हा सर्वज्ञात आहे पण ह्या दोन रस्स्यांच्या पलीकडची गोष्ट म्हणजे 'रस्सा मंडळ'. रस्सा मंडळ हा कोल्हापूरच्या सार्वजनिक समाजाचा अविभाज्य घटक आहे. मुख्यत्वे बुधवारी संध्याकाळी १०-१५ मित्र एकत्र कुठल्यातरी नदीच्या किंवा तलावाच्या काठी उदाहरणार्थ पंचगंगा किंवा रंकाळा इथे भेटतात आणि वर्गणी काढून विकत आणलेले मटण शिजवतात. प्रत्येकजण आपल्या घरून स्वतःची ताट, वाटी, आणि भाकर्या घेऊन येतात आणि गप्पा टप्पा करून रस्सा होरापून रात्री परत घरी. हो आणि कोल्हापुरी माणूस दिवसभर काही दिवे लावो पण रात्री घरीच जातो.
इथला शब्दकोश सुध्दा थोडा वेगळा आहे. 'फाळका टाकणे' म्हणजे भरपेट जेवण झाल्यावर पोटाचा पट्टा सैल करणे. शिडशिडीत अंगकाठीच्या मुलीला 'काटा ' मध्यम बांधेवालीला 'कंडा' आणि स्थूल मुलीला 'आयदान' असे म्हणतात. आज 'काटा किर' झाली म्हणजे आज जिंकलो. 'खटक्यावर बोट जागेवर पल्टी' म्हणजे एका हाती लढलो वगैरे वगैरे अशी बरीच उदाहरणे आहेत.
(क्रमशः)
आपला,
(नादाखुळा) विशुभाऊ

गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

शिवी

शिवी किंवा शिव्या ह्या शब्दशः जो घेतो त्याला त्या नक्कीच अश्लील वाटतात. पण काही वेळेला ज्या तिखट भावना व्यक्त करायला शब्द कमी पडतात तेव्हा शिव्याच कामी येतात. मंदारशेठ म्हणतात तसे 'भावना व्यक्त करायला जेव्हा ओव्या कमी पडतात... तेव्हाच शिव्या जन्म घेतात..'. शिवी हा भाषेचा एक सुंदर अलंकार आहे आणि तो योग्य वेळीच वापरायचा असतो.
मी स्वतः एकदा शिवी शब्दशः घेतली होती आणि फार मोठी गम्मत झाली होती. आमच्या कॉलेज मध्ये एक चटपटीत पोरगी होती. ती जेव्हा रस्त्यावरून चाले तेव्हा थोर योगी मुनी सुध्दा चळलतील असे ते लावण्य. मीच काय संपूर्ण कॉलेज तिच्यावर फिदा होतं. अगदी भावना जेव्हा असह्य झाल्या तेव्हा तिला मी भर वर्गात प्रपोज केले . तेव्हा ती म्हणाली "इफ यु डू इट अगेन , आय विल फक यु बास्टर्ड !". तिच्या ह्या वाक्यावर मी जाम खुश झालो आणि म्हणालो होतो "एनी टाईम एनी व्हेअर!!!" ........ तेव्हा तिच्या भावना समजण्याची अक्कल होती कुठे ??? मला माझ्याच भावना महत्वाच्या होत्या !!!
आपला,
(चळलेला) विशुभाऊ

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

माझे सिंगापुरायन

सुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर "माझे सिंगापुरायन" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुलकर यांच्या हस्ते चिपळूण येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात ई साहित्य प्रतिष्ठानच्या युनिट मध्ये झाले.
येथील तरुणाईचा जोश आणि जल्लोष बघून श्री तेंडुलकर म्हणाले," मुख्य संमेलनाहून मला हे युनिट अधिक आवडले". बस्स. thats it.
पुर्ण पुस्तक डाऊनलोड करण्या साठी ईथे >>क्लीक<< करा