हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

तुंबाड

तुंबाड हा फक्त एक सिनेमा नसून, स्वतःला त्यात गुंतवणारा एक अनुभव आहे. पुस्तकातील भयकथा वाचताना जसे चित्र डोळ्या समोर उभे राहते अगदी तसेच इफेक्ट देऊन सिनेमा उभा केला आहे. प्रत्येक प्रसंगातील एक एक डिटेलिंग एवढे सुंदर आहे कि, पुस्तक वाचताना आपण जसे रिडींग बिटवीन द लाईन्स करतो अगदी तसे घडते.
मुळात तुंबाड हि रवी बर्व्यानी लिहिलेल्या कथेवर लवक्राफ्ट ह्यांच्या 'हस्तर' ह्या काल्पनिक दैवाची, स्टीवन किंगची 'ग्रॅम्मा' आणि त्याचे भावांतर असलेली नारायण धारपांची 'आजी' आणि ऋषिकेश गुप्तेनी पुढे जाऊन त्यावर आधारित लिहिलेल्या 'गानू आजी' ह्या सर्वांचे संस्कार आहेत. एवढे संस्कार घेऊन कथा लिहिताना आणि दिग्दर्शित करताना त्याला नक्कीच न्याय मिळाला आहे असे मला वाटते. नारायण धारपांचा आणि त्यांच्या लिखाणाचा मी चाहता असल्याने मला वाटते कि त्यांच्या 'आजी' आणि 'बळी' ह्या दोन कथांची एकत्र सांगड घालून तयार झालेली कलाकृती म्हणजे 'तुंबाड'.
तुंबाड च्या कथेला धारपांच्या कथेचे स्फुरण आहे हे स्वतः रवी बर्व्यानी मान्य केले असले तरी हा सिनेमा एक मास्टर पीस आहे. दिग्दर्शन आणि ऍनिमेशन ह्याची एक सुंदर सांगड घातलेली आहे असे म्हणायला हरकत नाही, फक्त पुण्याचे काही रटाळ सिन सोडता.

पुढील लिखाण हे सिनेमा न बघितलेल्यानी वाचू नये (!! स्पॉईलर अलर्ट !!)

सिनेमा मध्ये मी केलेलं रिडींग बिटवीन द लाईन्स :
१) 'विनायक' आणि 'सदाशिव' हे वाड्यात राहण्याऱ्या म्हाताऱ्या 'सरकार' ची अनैतिक मुलं असून त्यांच्या घरात राहणारी म्हातारी ही त्या म्हाताऱ्या सरकारची आई आणि त्या मुलांची आजी आहे.
२) म्हातारीला 'हस्तर' झपाटल्याने, देवीच्या गर्भातील सोने काढण्याची पद्धत त्या म्हाताऱ्या सरकारला कळली नाही आणि त्या मुळे त्याला खजिना कधीच मिळाला नाही.
३) म्हातारीला जीवनातून मुक्त करण्याच्या अटीवर विनायकला पध्द्त समजली, आणि म्हातारीला चपळतेने विहिरीत उतरता येत असल्याने तिला तिचा नवरा मेल्यावर सुद्धा सती जाऊन दिले नव्हते.
४) मुळात गर्भात दाखवलेला 'हस्तर' हा लोभाचे प्रतीक आहे आणि त्यामुळे अति लोभाने जास्त प्रमाणात आणलेल्या पिठाच्या बाहुल्यांनी जास्त 'हस्तर' प्रतिमा तयार केल्या.

तेव्हा तुम्हाला ह्या सिनेमा बद्दल काय वाटले ते नक्की कळवा !

आपला,
(भयकथा प्रेमी) विशुभाऊ