संध्याकाळी ५ वाजताच आभाळ दाटून आल्या मुळे काळोख झाला होता. तीन तासात अहमदाबादला जाणारी फ्लाईट होती आणि माझे आजून पॅकींगच चालू होते. घरात माझी धावपळ चालू होती आणि चिऊ शांत पणे तिची बाहुली मांडीवर घेऊन तिच्याशी खेळत होती. चिऊ ची आई तीन दिवसान पूर्वीच अमेरिकेच्या टूर वर गेलेली होती आणि आज मी सेल्स कॉल साठी २ दिवस अहमदाबादला चाललो होतो. हि मला डायरेक्ट अहमदाबादलाच भेटणार होती आणि तेथून आम्ही देघे एकत्र मुंबईत परत येणार होतो.
शाळेची भरलेली बॅग त्या बाजूला दोन दिवसांची कपड्यांची बॅग आणि त्या बाजूला इवलीशी ४ वर्षांची चिऊ तिच्या बाहुलीशी तिची आई होऊन खेळत होती तिला समजवत होती तिला रागे भरत होती. तिचा तो खेळ बघून मी तिला जवळ घेतले आणि गालावर एक छान मुका दिला तर तिने लगेच तिच्या बाहुलीला तसाच एक मुका दिला. मी म्हटले "चिऊ मी आणि मम्मा दोन दिवसांनी येऊ तर तू आजी आज्जू कडे शहाण्या सारखी राहा वेडे पणा करू नको !". तिने मानेनेच 'हो' म्हटले, आणि मला तिचे भरून आलेले डोळे सुध्दा दिसले पण माझा नाईलाज होता. तिन ब्लु चिप्स कॉल्स त्यात एक जवळ जवळ कन्फॉर्म ऑर्डर आणि खरे सांगायचे तर मी खूप एक्साईटेड होतो.
मी उठून बॅग घेतली आणि चिऊ ला घेण्या साठी गेलो तर ती तिच्या बाहुलीला सांगत होती "मम्मा २ दिवसांनी येणार शहाण्या सारखी राहा वेडे पणा करू नको...", आणि तिने बाहुली घरात तिच्या खुर्ची वर ठेवली. मी तिला म्हटले "आगं बाहुली घे ना ती एकटी कशी राहील ?"
तर चिऊ म्हणाली "मी राहते ना !!!"
बाहेर कडाडून वीज कोसळली आणि आभाळ फुटावं तसा पाऊस कोसळू लागला ....
आपला,
(?) विशुभाऊ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा