हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

अंता माते

फट्याकSSS  !
मी सणसणीत कानफटात लगावली आणि बोललो "माझी थट्टा करतोस? अंतरात्मा असे नाव असते का?"
"अरे अंता माते असे नाव आहे माझे , अंता माझे नाव आणि माते शेवटचे नाव !"
इयत्ता आठवीत माझ्या वर्गात आलेल्या नवीन वर्गमित्राला नाव विचारताना घडलेली ही गोष्ट. शेवटचे नाव म्हणजे आडनाव कि अजून काही ते कळले नाही, पण माझ्या ऐकण्यातील चुकी मुळे मी समोरच्याला एक लगावल्याने फार खजील झालो.
"माफ कर मित्रा चूक झाली !"
त्याने हात जोडले आणि म्हणाला "माफी मागणारा देवा पेक्षा थोर असतो.... त्यात तू मला मित्र म्हणालास... तुझा राग कधीच येणार नाही!"
त्याचे तत्वज्ञान ऐकून मी गोंधळून गेलो, माझ्या इतक्या वर्षांच्या मनोवृत्तीला आणि अहंकाराला उभा तडा देणारे होते हे.
गण्या त्यादिवशी शाळेत नसल्याने त्याला मी माझ्या बाकावर बसवून घेतले. तो मन लावून अभ्यासाकडे लक्ष देत होता आणि मी संपूर्ण दिवस धक्क्यातून सावरत नव्हतो.
नंतर कळले की तो ठाण्याच्या कुठल्यातरी आदिवासी पाड्यातला एक आदिवासी आहे. त्यावेळी मला आदिवासी म्हणजे 'झिंगलाला' करणारे धनुष्यबाण वाले असेच वाटत असे. पण हा तसा दिसत नव्हता. रोज चुरगळलेला पण स्वच्छ गणवेश घालून केस विंचरून यायचा. त्याचा 'दादू' म्हणजे मोठा भाऊ त्याला सकाळी रिक्षेने शाळेत सोडायचा आणि नंतर स्वतः दिवसभर रिक्षा चालवायचा.
कालांतराने मी त्याच्याशी एक अंतर ठेवू लागलो. माझा ग्रुप वेगळा, माझे वाचन वेगळे आणि मुळात गप्पा वेगळ्या. पण हा रोज माझ्यासाठी जंगलातील 'मेवा' आणायचा. मेवा म्हणजे बोरांचे, चिंचेचे, तत्सम फळांचे किंवा मधाचे वेगवेगळे प्रकार. माझी खाण्यातील रुची त्याने बरोबर हेरली होती आणि तो ती यथाशक्ती पुरवत होता. मेवा देऊन बदल्यात तो काहीच अपेक्षा धरत नव्हता, ना बोलण्याची ना खेळण्याची ना अभ्यासाची. माझ्याशी मैत्री निभावणे हे देवाने दिलेले कर्तव्य असल्या सारखे निर्मळ मनाने तो पूर्ण करत होता. मी फक्त भोग घेत होतो व तेव्हा मला किंवा माझा मनाला काहीच वाटत नव्हतं.
नंतर इयत्ता ९वी मध्ये त्याला कुठली तरी शिष्यवृत्ती मिळाली आणि तो वसतिगृह असलेल्या कुठल्यातरी शाळेत गेला. जाताना मला सांगून गेला पण मी बेपर्वाईने त्याला 'ठीक' असे बोलून टाटा केला व परत आपल्या दिनक्रमेत रुजू झालो.
ह्या गोष्टीला अंदाजे २२ वर्षे झाली असतील आणि इतक्या मोठ्या कालखंडात तो माझ्या विस्मृतीत गेला.  आज सकाळी ऑफिसला जाताना सिग्नलला माझ्या कारच्या बाजूला कॅम्री उभी होती. मी त्या गाडी कडे पहिले तेव्हा त्या गाडीवाल्याने काच खाली करून माझ्या कडे पहिले व हसला. मला ओळखायला पण फार वेळ नाही गेला तो अंताच होता.
सिग्नल क्रॉस केल्यावर मी गाडी बाजूला घेतली आणि त्याच्या साठी बाहेर आलो. त्याने सुद्धा गाडी बाजूला घेतली आणि काच खाली करून सांगितले "अरे माझी फॅक्टरी पण वागळे इस्टेट मध्येच आहे तुझ्या ऑफिस जवळ, फॉलो मी वी विल टॉल्क देर !"
मी पुन्हा बधिर होऊन बसलो गाडीत 'म्हणजे मी काय करतो आणि कुठे आहे हे त्याला माहित आहे !' .......

"हम बेवफा हो गये पर यार यारी निभाता रहा !!!"

आपला,
(मित्रनिष्ठुर) विशुभाऊ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा