भारतवर्षातील अनेक नद्यां पैकी नर्मदा नदी हि अशी एकमेव नदी आहे जिची अनेक शतकानुशाताकांपासून विधीपूर्वक परिक्रमा केली जाते. नर्मदा परिक्रमा अतिशय खडतर तीनहजार किलोमीटर अंतर असलेली परिक्रमा आहे. हिमालयात जसे अनेक योगी, संत, समाधी अवस्थेत साधना करतात आणि त्यांचे अनुभव सर्वज्ञात आहेत, तसेच नर्मदेच्या परिसरात अनेक साधकांना योग्यांचा आणि ऋषीतुल्यांचा साक्षात्कार तसेच दर्शन झाले आहे.
परिक्रमेची सुरुवात नर्मदेचा उगम असलेल्या अमरकंटक येथून परंपरे प्रमाणे केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला नेमावर किंवा ॐकारेश्वर येथून सुध्दा सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेचा साधा ओघळ सुध्दा ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणार्या नद्या ओलांडलेल्या चालतात. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी असा संकेत आहे. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत 'ॐ नर्मदे हर' या मंत्राचा जप व नामस्मरण करायचे असते.
परिक्रमेदरम्यान आयुष्य 'सूर्योदय ते सूर्यास्त' व 'सूर्यास्त ते सुर्योदय' या दोन काळांमध्ये विभागले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही.
मराठी भाषेत नर्मदे परिक्रमेवर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. गो.नी. दांडेकरांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा' व 'नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा', धृव भट्ट यांनी लिहिलेले 'तत्वमसि', जगन्नाथ कुंटे ह्यांचे '
नर्मदे ऽऽ हर हर', रघुनाथ रामचंद्र गुण्ये ह्यांचे 'नर्मदे हर'. ह्या पैकी जगन्नाथ कुंटे ह्यांचे '
नर्मदे ऽऽ हर हर' वाचणे म्हणजे निव्वळ परिक्रमा करण्याचा मिळणारा अनुभव.
जगन्नाथ कुंटे ह्यांची लिखाणशैली वाचकाला नर्मदा परिक्रमेवर घेऊन जाते. त्यांचे अनुभव, त्यांना दिसणारी दृश्ये हि अक्षरशः वाचकाला दिसू लागतात. त्यांची लिखाणातील म्हणा किंवा मूळ स्वभावातील म्हणा विनोदी आणि मनमौजी छटा अध्यात्माचे रटाळ किंवा कोरडे फटके न वाटता प्रेमळ अनुभव देतो. त्यांची आपल्या सद्गुरु वरील श्रद्धा आणि नर्मदा माते वरील भक्ती आणि ह्या जोरावर पूर्ण केलेली खडतर परिक्रमा व त्यात आलेले अनन्यसाधारण अनुभव म्हणजे त्यांचे पुस्तक '
नर्मदे ऽऽ हर हर'.
पुस्तकाची सुरवात हि रटाळ प्रस्तावनेने न होता परिक्रमेच्या मजेदार अनुभव साराशांने होते, जसे परिक्रमा चालू केल्यावर लेखकाला समजलेल्या गोष्टी त्यांनी इथे सांगितल्या आहेत " परिक्रमेत मीठ ह्या खारट पदार्थाला 'रामरस' म्हणतात; चावलराम; दालराम; सब्जीराम; चपातीराम अशी जेवण्याच्या पदार्थाला 'राम' लावण्याची पध्दत.… ". पायी परिक्रमा करणाऱ्या लेखकाचा काटकपणा, अगदी कमी आहार, पराकोटीची सहनशीलता, त्यांची चालण्याची गती ह्या साऱ्या वर्णनात वाचक गुंतून, गुंगून समरस होऊन जातो. मनातल्या क्षणिक इच्छांची पूर्तता किंवा अडचणींचे निवारण आपोआपच होण्याचे प्रसंग वाचताना अचंबित व्हायला होते. नर्मदा परिसर, त्या काठावरचे भिल्ल - आदिवासी, अनेक गावांची, प्रदेशांची नावे इत्यादी भौगोलिक माहिती या पुस्तकातून सुंदर मांडली आहे. तिन्ही परिक्रमांमध्ये शूलपाणीच्या भयंकर जंगलातून लेखकाने केलेला प्रवास व त्यातले अनुभव विलक्षण आहेत. दिंडोरी वरून एका विराण ठिकाणावर अचानक दिसलेली दगडी वास्तू , त्यातील तीन साधू , त्यांनी दिलेला वाफाळलेला चहा आणि तो डोळे मिटून पिताना क्षणार्धात सर्व अदृश्य होणे आणि हातात फक्त चहाचा रिकामा ग्लास; नर्मदेच्या प्रवाहातून पुजेची पोहोच म्हणून मोतीचुराच्या लाडवांची टोपली घेऊन येणारी व्यक्ती व तिचे अदृश्य होणे यासारखे अनेक अद्भुत अनुभव वाचकाला खिळवून ठेवतात.
जगन्नाथ कुंटे यांनी पुस्तकात वर्णन केलेले काही प्रसंग विलक्षण गूढ आणि अनाकलनीय आहेत, घडलेल्या गोष्टींवर जर विश्वास ठेवला तर खरच अतर्कनीय आणि अचंभित अवस्थेत वाचक जातो. उदाहरणार्थ, 'तिसर्या परिक्रमेत त्यांना झालेले अश्वस्थामाचे दर्शन', 'एकदा नदी पार करताना छोट्या मुलीच्या रूपात प्रत्यक्ष नर्मदामाईने दिलेले दर्शन'. तसेच, पुण्यात आल्यावर परिक्रमा पूर्ण झाल्याचा आणि नर्मदा मातेने पूजा स्वीकारल्याचा प्रत्यय म्हणून वृद्ध व्यक्तीच्या रूपात पुन्हा नर्मदामाईने दर्शन दिल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला आहे.
पुस्तका मध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा रंगलेल्या आहेत, तरी त्यात मनाला भावणारी व्यक्ती म्हणजे कुंतल चटर्जी. जगन्नाथाजी यांच्या प्रवासात बरच काळ कुंतल या बंगाली तरुण साधूने सोबत केलेली आहे. सधन घरातला एकुलता एक लाडात वाढलेला उच्चशिक्षित पण शांतीच्या शोधात सर्वत्याग करून घराबाहेर पडलेला कुंतल वाचताना खूप भावतो व आपण किती क्षुद्र वासनेच्या आहारी आहोत ह्याची जाणीव करून देतो.
शूलपाणीच्या जंगलातील अनुभव वर्णन फार सुंदर आहे. हे जंगल मामांकडून लुटले जाण्यासाठी प्रसिध्द आहे. हे मामा म्हणजे काय ते लेखकानेच पुस्तकात फार सुंदर शब्दात सांगितले आहे " शूलपाणीच्या जंगलात पहिल्याच दिवशी एक भिल्ल जमात तुम्हाला लुटते. 'नर्मदापुराणा'त त्यांना 'नर्मदेचे भाऊ' म्हटले आहे. म्हणून त्यांना 'मामा' म्हणतात. ते लुटतात आणि आपण लुटून घ्यायचे. जन्मभर हे माझे, हे माझे करून आपण आसक्तीने वस्तू जमा करतो. ती आसक्ती सुटावी हा लुटण्याचा मुख्य हेतू. हेतू चांगलाच आहे. लुटणारा आणि लुटून घेणारा दोघेही भाग्यवान. सुखी जीव." पहिल्या परिक्रमेतला लेखकाचा शूलपाणी मधला अनुभव रोमांचकारी आणि विनोदी दोन्ही आहे. मामांनी लुटल्यावर जगन्नाथजी ह्यांच्या कडे देव आणि अंगावर लंगोट एवढेच राहिले होते.
लेखकाने शक्तीपाताची दीक्षा घेतलेली असल्याने साधना करताना कुंडलिनीच्या क्रिया व त्या मुळे होणारी योगासने व ती पाहून अनेक लोकांनी त्यांच्या कडून दीक्षा मिळवण्या साठी केलेला खटाटोप. भावनेच्या भरात दुष्काळी गावाला दिलेला पावसाचा आशीर्वाद खरा होणे व त्यामुळे लोकांची झालेली वाचासिद्धीची समजूत. अश्या अनेक चमत्कारीत गोष्टी वाचताना आश्चर्य वाटते पण तरी लेखक त्यात स्वतःला काहीही लौकिक देत नाही.
लेखक जगन्नाथ कुंटे हे लहानपाणा पासून अध्यात्मिक प्रवृत्तीचे. वयाच्या दहाव्या वर्षी जेव्हा सर्वसाधारण मुलं खेळण्यात रमलेली असतात तेव्हा हे हिमालयात निघून घेले होते. संसारात असतानाही साधने साठी ह्यांची भटकंती चालू. साधनेत असताना किंवा परिक्रमेत असताना घराची, बायको-मुलांची त्यांना आठवण नाही, ओढ नाही. जेव्हा साधनेची मस्ती उतरते तेव्हा एक सामान्य, अशिक्षित माणूस. सतत सिगरेट ओढतात, त्यामुळे अध्यात्मातला माणूस असेल असं सांगूनही खरं वाटणार नाही असे व्यक्तिमत्व. व्यावहारिक जगात सगळ्यांच्यात देव बघायची त्यांची वृत्ती पुस्तकातील वाक्यागणिक दिसून येते.
लेखका इतकच कौतुक वाटावं ते त्यांच्या पत्नी सौ. जानकी कुंटे यांचं. नवरा घरातून कधीही उठतो आणि ' निघालो' असं सांगतो, बायकोला नमस्कार करतो आणि हिमालयात किंवा नर्मदा परिक्रमा करून ३-४ वर्षांनी घरी परत येतो. तरी ह्या माऊलीची ह्याबद्दल कुठेही तक्रार नाही कि कटकट नाही. संपूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर घेऊन ह्या मातेनी संसारात राहून केलेली 'साधना' खरोखर महान आहे. हि तीच माता जिने भटकंती करणारा संन्यासी प्रवृत्तीचा नवरा असताना 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे अप्रतिम पुस्तक लिहिणारा लेखक घडवला.
'
नर्मदे ऽऽ हर हर' हे पुस्तक म्हणजे धार्मिकतेचा किंवा अध्यात्मिकतेचा बाऊ करणारे नसून धर्माची दुकानदारी आणि बुवाबाजीची फसवेगिरी ह्यावर फटकेबाजी करणारे सुध्दा आहे. ह्या पुस्तकाचे लिखाण एकसुरी नसून बहुमितीय आहे. ह्या पुस्तकात मेधाताई पाटकरांच्या कार्याबद्दल देखील तळमळीने लिहिले आहे. स्वतःला संन्यासी म्हणवणाऱ्या तामसी प्रवृत्तीच्या लोकांवर कोरडे ओढले आहेत आणि त्याच वेळी 'चमत्कार' वाटावा असे अनुभव सहजतेने सांगितले आहेत. एका झपाटलेल्या नर्मदा परीक्रमेचे हे कथन नक्कीच वाचनीय आणि संग्रहित करण्यायोग्य आहे.
आपला,
(परिक्रमावासी) विशुभाऊ रणदिवे