हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

शाळा


मी मुकुंद जोशी उर्फ जोश्या. मागच्या वेळी जाता जाता पांडुरंग सांगवीकर लिहून गेला म्हणून विशुभाऊने आता पण मलाच लिहायला बसवले. पांडू बोलतो तसा विशुभाऊ चाप्टरच, मला जाता जाता पांडू सांगून गेलाच कि ह्याच्या बरोबर ऑफिसला जाऊ नको हा काम धाम सोडून आपल्याशी गप्पा मारत बसतो. पण विशुभाऊने सुम मध्ये शनिवार रविवार मध्ये सगळ्या गप्पा आटोपल्या. इचिभना, विशुभाऊने मी इथे यावे म्हणून खोटे सांगितले शिरोडकरच्या बाबांची बदली सिंगापुरात झाली आहे.
बोकीलांनी मला नाव वगैरे दिले, पण मी म्हणजे शाळेत गेलेला प्रत्येक मुलगा. शाळेत सुऱ्या, फावड्या, चित्र्या, बिविकर वगैरे सारखी सगळीच मुलं असतात, पण शाळा वाचताना प्रत्येकजण स्वतःला जोश्याच समजतो. शाळेत प्रत्येकाची एकतरी लाईन असतेच नसल्यास नरूमामा म्हणतो तसं त्याने आपली 'वैद्यकीय चाचणी करून घ्यावी'. लाईनिचा विषय चालू असताना विशुभाऊने मला दिप्याची गोष्ट सांगितली आणि आम्ही बराच वेळ हसत होतो. मी पण उगाच विशुभाऊला डिवचल्यवर त्याने तर कहर केला, त्याच्या शाळेतल्या १०-१२ शिरोडकर सांगितल्या.
शनिवारी संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. इथे मुलं मुली कधीही आणि कुठेही मिठ्या मारून मुके घेत उभे असतात. सुऱ्या असता तर त्याने उच्छाद मांडला असता. पण अश्लील काम भिंती आडच करतात आपल्या सारखे नाही दिसले झाड चालू. इथला समाज आणि आपला थोडा वेगळा आहे. शाळा वाचून झाल्यावर हेरंबने बरेच 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करून आपल्या ब्लॉग वर ह्या पुस्तकातून दिसणारं आपल्या समाजाचं, शिक्षणपद्धतीचं, संस्कारांचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, नाजूक वयातल्या मुलामुलींमधल्या सुप्त आकर्षणाचं, नातेसंबंधांचं, भावभावनांचं वगैरे स्पष्टीकरण दिले आहे.
माझ्या इयत्ता नववी वरती लिहिलेले हे पुस्तक सुजय डहाकेने चित्रित करायचा प्रयत्न केला, पण मला नाही वाटत ते तेव्हडं जमलं. पण त्यात शिरोडकर एकदम पर्फेक्ट घेतली. तसंही म्हणा एक आख्खे वर्ष त्यात एवढे 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करून ३ तासात बसवणं सोप्पं नाही.
बोकीलांनी लिहिलेले आणि माझ्याकडून वदवलेले हे वाक्य मात्र तितकेच खरे 'त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणंफार सुंदर आहे.'
आपला,
(शाळेतला) जोश्या

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

कोसला

kosala
खरेतर हे विशुभाऊने स्वतः लिहायला पाहिजे होते. पण भालचंद्र नेमाड्यांनी मला 'शंभरातल्या नव्व्याण्णवांस' अर्पण केल्या मुळे आणि विशुभाऊ ९९% मधला निघाल्या मुळे, अगदीच सामान्य निघाला. तसा सुरवातीला मी आकाश गुप्ते कडे होतो तेथून सौरभ बोंगाळे कडे आणि नंतर विशुभाऊ कडे आलो. सुरुवातीला मला थोडे फार उदाहरणार्थ चाळल्या नंतर विशुभाऊ मला सिंगापूरला घेऊन निघाला पण वजन जास्त झाल्यामुळे मी पुन्हा घरी गेलो. दिवाळीत एकदाचा मी सिंगापूरला पोहचलो. खरं तर तुम्हाला वगैरे सांगण्या सारखे एवढेच.
इथे आल्यावर सुरुवातीला दोन दिवस विशुभाऊने मला कपाटातच ठेवले. नंतर उदाहरणार्थ त्याच्या बरोबर ऑफिसला, चहाला, जेवायला आणि सगळी कडेच जायला लागलो. तो कामाच्या नावाखाली कंपनीला फसवतो वगैरे हे मला लगेच कळले. सुरुवातीला विशुभाऊला असे वाटत होतं कि मी सायको वगैरे आहे. पण नंतर त्याला उत्साह वगैरे यायला लागला. एकदा आम्ही ऑफिस मध्ये रंगात आलो असताना अचानक भले मोठे काम आले. त्याने उदाहरणार्थ सर्वर वरच्या एक दोन लायब्ररी फाईल बदलल्या आणि ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे सांगुन सिस्टीम ऍडमीनला कामाला लावले. मला कळले हा इचल्या पेक्षा चाप्टर आहे. पण मनू  गेली तेव्हा हा ऑफिस मध्ये सुध्दा रडला. मला म्हणाला नंतर तू अजंठाला गेलास ते बरे. पण बदललास.
ऑफिसमध्ये येता जाता बस मध्येतर आम्ही धिंगाणा घालायाचोच पण रात्री जेवताना तर धमाल. सिंहगडची गोष्ट सांगताना तो इतका रंगला कि माझ्या ऐवजी तोच घसरून पडला बसल्या बसल्या. त्या हॉटेल मधल्या मलय बाईने माझ्या कडे पाहून विचारले 'व्हीच भाषा' तर पठ्ठ्याने लगेच सांगितले 'मराठी भाषा'. ह्याने आपल्या भाषेचा चांगलाच प्रचार केलेला आहे.
तर मी बापाचा पैसा खर्चावून परीक्षा वगैरे नीट कधीच दिल्या नाहीत आणि म्हणूनच तुम्हा लोकांच्या म्हणजे 'शंभरातल्या नव्व्याण्णव' जणांच्या हृदयात बसू शकलो. आता इथे वगैरे सांगणे एवढेच. पुढे तुम्हीच वाचा. मी निघतो आहे. विशुभाऊ कडे उद्या पासून शाळेतला जोशी पुन्हा येतो आहे.
तर मी वर्ष च्या वर्ष फुकट घालवून कमावले काहीच नाही. तेव्हा गमावली हि भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबर.
असाच लोभ असावा.
आपला,
पांडुरंग सांगवीकर

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

थट्टा

"सुपारी ..... तुझे लग्न दुपारी" "पडावा ..... नीट बोल गाढवा" वगैरे लहानपणीची थट्टा करायची वाक्ये वापरता वापरता थट्टा करणे हा माझा गुण कधी झाला तेच समजले नाही. तशी विनोदी थट्टा करणे हे कधी कधी चांगले असते पण कधी कधी अंगाशी सुध्दा येते. थट्टा तशी कधी मुद्दाम होते तशीच केव्हा केव्हा अजाणते पणे सुध्दा होते. शाळेत असताना एकदा व्यासपीठावर माईक समोर आमच्या मुख्याधापाकांचे पूर्ण नाव 'पुंडलिक अप्पा खामकर' मी चुकून सवयी प्रमाणे 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल' च्या तालात घेतले, आणि तोंड रंगवून हनुमाना सारखा चेहरा घेऊन परतलो होतो.
असे बरेच प्रसंग माझ्या बरोबर झाले तरी सवय काही गेली नाही. आज सुद्धा असाच एक 'अतिप्रसंग' मी स्वतःवर ओढून घेतला. ऑफिस मधून निघालो आणि बस स्टॉपवर माझ्या एका चायनीज कलीग 'ली इयान' (हे मुलीचे नाव आहे) बरोबर बोलत उभा होतो इतक्यात माझी एक मेहुणी तिच्या नवऱ्या बरोबर मला तिथे भेटली. इतक्या वर्षात मुंबई मध्ये एकमेकांचे तोंड न पाहिलेलं, पण दुरूनच ह्या बयेने मला सिंगापुरातल्या गर्दीत बरे ओळखले. भेटताच आम्ही एकमेकांना हसून 'ग्रीट' वगैरे केले आणि गप्पा मारायला सुरुवात केली, तरी माझ्या मेहुणीचे लक्ष मात्र ली इयान कडेच होते. आता स्त्री मानसशास्त्राचे माझे ज्ञान अफाट असल्याने तिच्या कुशाग्र बुद्धीचा अंदाज घेण्यास मला वेळ लागला नाही, आणि मला पुलंचा नाम्या परीट आठवला. मी म्हटले "आगं हि माझी फॅमेली !!!". मेहुणीचा नवरा गडबडला खरा पण सावरत म्हणाला "मुंबईचे काय?". म्हटले "ते आहेच .... हि स्टेपनी!".
मेहुणी भोळ येऊन पडायचीच बाकी होती पण तिचा नवरा व्यासंगी असल्याने त्याने लगेच ओळखले आणि म्हणाला "तर नाम्या चांगले चालू आहे तुमचे 'सिंगापुरायन'" , आणि आम्ही दोघे जोरात खो खो करून हसलो. संदर्भासहित स्पष्टीकरण दिल्यावर बायकोच्या बहिणीचा जीव भांड्यात पडला आणि माझ्या थट्टेची दाद देऊन दोघेही तेथून निघाले.
मी वळून
ली इयान कडे पहिले तर तिने रागाने माझ्या कडे पाहून विचारले "डिड यु कॉल मी 'फॅमेलि' ऍण्ड 'स्टेपनी' ????"
आपला,
(थट्टेखोर) विशुभाऊ

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

माझा आवडता डास

शाळे पासून मी बरेच आणि वेगवेगळ्या विषयां वर निबंध लिहिले आहेत, पण 'माझा आवडता डास' ह्या विषयावर मीच काय कोणीही निबंध लिहिला असेल असे मला वाटत नाही. 'आवडणे' ह्या क्रिया साठी बरीच कारणे असतात, जसे 'आवडता सण' मध्ये दिवाळी येते कारण नवीन कपडे, लाडू, करंज्या, फटाके वगैरे वगैरे किंवा 'आवडता पक्षी' मध्ये कोंबडी येते कारण स्वाद वगैरे. तरी 'डास' मला कधी आवडू शकतो असे मला कधीच वाटले नव्हते.
छत्रपतींचे नाव आणि भारत मातेची शप्पथ घेताना भरून येणारी आमची 'मर्द' छाती, आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या वेळी शेपूट फटीत घालून बसते. अत्याचार कोणताही असो मग तो कासाबने केलेला गोळीबार आणि सरकारने त्याला दिलेला अभय असो किंवा करमणूक सांगून निर्मात्याने आपली केलेली फसवणूक असो, त्या विरुद्ध आमचा आवाज हा फक्त फेसबुक आणि ब्लॉग इत्यादी वरतीच उठतो.
जेथे जन्मलो, जेथे वाढलो त्या मातृभूमीचा अभिमान हा सगळ्यांनाच असतो पण तो बाळगणे आणि पोसणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही, त्या साठी 'डेंगू' डासां सारखी निधडी छाती लागते. डासांच्या ह्या अनेक प्रजातीं मध्ये माझी आवडती जमात म्हणजे 'डेंगू', डेडिकेशन आणि डिटर्मीनेशन ने भरलेली हि जमात. हजार वेळा ज्याच्या नावाने बोटे मोडून आणि शिव्याशाप देऊन जे जमले नाही ते ह्या जमातीने एका रात्रीत कडी कुलपांची सर्व बंधनं तोडून कासाबला चाऊन 'करून दाखवलं' (हा शब्द उध्दव दादा कडून वापरून झाल्यावर परत करण्याच्या अटीवर उधार आणला आहे!).
फार पूर्वी एक मद्रासी (मुंबई मध्ये सगळे दक्षिण भारतीय हे माद्रसीच असतात) चित्रपट 'अपरिचित' पहिला होता. तो अपरीचीत नावाचा माणूस प्रत्येक अत्याचारावर स्वतः ऍक्शन घेतो, त्या प्रमाणे भारतातले अत्याचार संपवण्याचा विडा हा ह्या डेंगू डासांनी उचलला आहे. त्याचा पुनः प्रत्यय मला 'जब तक है जान' हा चित्रपट पाहिल्यावर झाला.
असो तर ह्या मझ्या आवडत्या डासां बद्दल माझा अभ्यास जोरात चालू आहे आणि लवकरच त्यावर निदान १५ ओळींचा निबंध लिहीन म्हणतो ..... कसे ?
आपला,
(निर्बंधक) विशुभाऊ