हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

शाळा


मी मुकुंद जोशी उर्फ जोश्या. मागच्या वेळी जाता जाता पांडुरंग सांगवीकर लिहून गेला म्हणून विशुभाऊने आता पण मलाच लिहायला बसवले. पांडू बोलतो तसा विशुभाऊ चाप्टरच, मला जाता जाता पांडू सांगून गेलाच कि ह्याच्या बरोबर ऑफिसला जाऊ नको हा काम धाम सोडून आपल्याशी गप्पा मारत बसतो. पण विशुभाऊने सुम मध्ये शनिवार रविवार मध्ये सगळ्या गप्पा आटोपल्या. इचिभना, विशुभाऊने मी इथे यावे म्हणून खोटे सांगितले शिरोडकरच्या बाबांची बदली सिंगापुरात झाली आहे.
बोकीलांनी मला नाव वगैरे दिले, पण मी म्हणजे शाळेत गेलेला प्रत्येक मुलगा. शाळेत सुऱ्या, फावड्या, चित्र्या, बिविकर वगैरे सारखी सगळीच मुलं असतात, पण शाळा वाचताना प्रत्येकजण स्वतःला जोश्याच समजतो. शाळेत प्रत्येकाची एकतरी लाईन असतेच नसल्यास नरूमामा म्हणतो तसं त्याने आपली 'वैद्यकीय चाचणी करून घ्यावी'. लाईनिचा विषय चालू असताना विशुभाऊने मला दिप्याची गोष्ट सांगितली आणि आम्ही बराच वेळ हसत होतो. मी पण उगाच विशुभाऊला डिवचल्यवर त्याने तर कहर केला, त्याच्या शाळेतल्या १०-१२ शिरोडकर सांगितल्या.
शनिवारी संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. इथे मुलं मुली कधीही आणि कुठेही मिठ्या मारून मुके घेत उभे असतात. सुऱ्या असता तर त्याने उच्छाद मांडला असता. पण अश्लील काम भिंती आडच करतात आपल्या सारखे नाही दिसले झाड चालू. इथला समाज आणि आपला थोडा वेगळा आहे. शाळा वाचून झाल्यावर हेरंबने बरेच 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करून आपल्या ब्लॉग वर ह्या पुस्तकातून दिसणारं आपल्या समाजाचं, शिक्षणपद्धतीचं, संस्कारांचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, नाजूक वयातल्या मुलामुलींमधल्या सुप्त आकर्षणाचं, नातेसंबंधांचं, भावभावनांचं वगैरे स्पष्टीकरण दिले आहे.
माझ्या इयत्ता नववी वरती लिहिलेले हे पुस्तक सुजय डहाकेने चित्रित करायचा प्रयत्न केला, पण मला नाही वाटत ते तेव्हडं जमलं. पण त्यात शिरोडकर एकदम पर्फेक्ट घेतली. तसंही म्हणा एक आख्खे वर्ष त्यात एवढे 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करून ३ तासात बसवणं सोप्पं नाही.
बोकीलांनी लिहिलेले आणि माझ्याकडून वदवलेले हे वाक्य मात्र तितकेच खरे 'त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणंफार सुंदर आहे.'
आपला,
(शाळेतला) जोश्या

२ टिप्पण्या:

  1. आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणंफार सुंदर आहे.'

    +++ :)

    उत्तर द्याहटवा
  2. शाळा आयुष्यात बालपणी आणी उतारवयात पुन्हा एकदा भरावी असे वाटते.
    लेख आवडला.

    उत्तर द्याहटवा