हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, १३ जून, २०२०

माझा संगीत व्यासंग

माझ्या सारख्या बेताल माणसाला संगीताचा ओलावा कळतो, ह्याच गोष्टीवर मुळात आमच्या कुटुंबाला विश्वास नव्हता.
फार पूर्वी एका संगीत मैफिलीत गवयाने घेतलेल्या सुंदर जागेवर, मी सात मजली आवाजात 'क्या बात है!' अशी दाद दिली तेव्हा संपूर्ण प्रेक्षकवर्ग गायकाला सोडून माझ्या कडे पाहू लागला आणि तो बिचारा गवई त्यावेळी गाणे विसरला. ह्या प्रसंगा नंतर मला कोणी मैफिलीत नेले नाही आणि मी सुद्धा एकांतात रेकॉर्डिंग ऐकून आंनद घेऊ लागलो.
तसे संगीत शास्त्राला खतपाणी घालावे असे काही आमच्या घराचे वातावरण नव्हते. वडिलोपार्जित व्याधी सोडून इतर काहीही न मिळालेले मध्यमवर्गीय आमचे घर. नोकरी करणारे वडील, घरात राबणारी आई, आणि विधात्याच्या कल्पनाशक्तीला सुद्धा आव्हान देणारी खोडकर लहान बहीण. त्यामुळे 'शिकलात तरच तराल' ह्या एका मंत्राच्या तालात माझे बालपण गेले.
शाळेत गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय सोडले तर मला इतर विषय मुळी समजलेच नाहीत. त्या मुळे बहुतेक शिक्षकांच्या आणि इतर वर्गमित्रांच्या दृष्टीने मी तसा उपेक्षितच होतो. एकदा माझ्या एका वर्गमित्राने कळवळून मला म्हटले होतं, 'अरे गणित हा काही आवडायचा विषय आहे का? आवडायचं असेल तर बाजूच्या बेंच वरची कुसुम आवडावी, पण गणित?' असे बोलून कडवट चवीचे आवभाव तोंडावर आणले. मला तेव्हा समजले की दोन विरोधाभासी संचांचा सामायिक घटक हा 'कुसुम' असू शकतो आणि हा एक विषय मित्रांचा कंपू बनवू शकतो.
असो, तर हे झाले विषयांतर.... तर काल माझ्या कुटुंबाला (आदरार्थी एकवचनी) जेव्हा समजले की मी देशपांड्यांच्या मारव्यावर संध्याकाळचा म्हणजे योग्यवेळी डुलतो आहे, तेव्हा तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली... तिने कपाटातील बाटलीत बंद केलेला/ली 'जीन' शोधली आणि एकही 'विष' न मागता बेसिन मध्ये त्याला मुक्त केलं....

आपला,
(रसिक) विशुभाऊ

रविवार, २४ मे, २०२०

पारसिक डेज : लॉकडाऊन शनिवार

लॉकडाऊन मध्ये कसला शनिवार नि कसला रविवार ? तरी शुक्रवार पासून फार महिनातीने तयारी करून मी विकेंड माहोल तयार केला होता.
शनिवार सकाळची सुरुवात ही अगदी पुलंच्या वर्णनातील सुट्टी सारखी झाली होती. आदल्या दिवशी वाचायला घेतलेल्या धारपांच्या गोष्टीतील 'आर्य' त्याच्या साहसाचा पराकोटीला होता, मकरंद वैद्य ने गद्र्यांकडून मागवलेली सुरमई तव्यावर चुरचुरत होती. सर्वेश तरेच्या 'बोंबील' मोबाईल ऍप मधून आलेली कोळंबी शेगडीवर उकळत्या कालवणाची सुवासीक चव सांगत होती.
महावीर आर्य ची साहस कथा आणि माझी उत्कंठता शिगेला पोहचलेली असताना, मी लॉकडाऊन मध्ये माझे मित्र आंब्रे यांनी पराकोटीच्या साहसाने आणि चिकाटीने मिळवलेली आणि मला भेट दिलेली व्हिस्की क्रिस्टल कट ग्लास मध्ये ओतली. ह्या काळात सहजासहजी मिळालेली व्हिस्की सुद्धा सोनाहून पिवळी दिसते... तर असो.... असा सुंदर माहोल तयार असताना अचानक (पण पारसिक नगरी लोकांच्या अंगवळणी पडलेलं नेहमी प्रमाणे) वीज गेली. मला अचानक आठवलं की लॅपटॉप २ दिवस झाले चार्ज केलेला नाही, मोबाईल १% बॅटरी वर आहे आणि इतक्यात हातातील किंडल ने प्राण सोडला .......
अश्या परिस्थितीत , माझ्या सारखा सज्जन हा दुर्जन झाला नसता तरच नवल ...... टोरंटच्या आईला शाब्दिक घोडे लावून पुन्हा चुप्प बसलो !!!!
 आपला,
(पारसिक नगरी) विशुभाऊ