हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, ४ ऑक्टोबर, २००९

निवड्णूक !

    ह्या निवडणूका आल्याकी मला जरा धडकीच भरते, जस जशी निवडणूकेची तारिख जवळ येते तस तशी हि ५ वर्ष बॅनरवर दिसणारी साहेब, नाना, तात्या, बंटी, भाऊ, कार्यसम्राट, ह्र्दयसम्राट वगैरे मंडळी आमच्या घरची धूळ झाडायला येतात. कोण जाणे कसे पण येताच नावाने हाक मारून आदबिने नमस्कार सुध्दा करतात, व मी नियमीत पणे त्यालाच कसे मत देत आलो आणि येणार हा प्रत्येकाला विश्वास देतो.....

    दर निवडणूकीला घरी आलेल्या उमेदवाराला मत देण्याच्या आश्वासनांची टेप माझी चोख पाठ असते, व त्यात (टेप वाजवण्यात) मी कधीच चुकत नाही. पण गेल्या महानगर पालिकेच्या निवडणूकांच्या वेळी मोठा गोंधळ झाला, त्याचे झाले असे की आमच्या मतदार संघातल्या धडाडिच्या आणि तरूण कर्यकर्त्या सुंदराबाई ( sorry ताई) भरदुपारी आमच्या घरी आपल्या पाळलेल्या इमानदार लोकांना घेऊन आल्या. मी नुकताच ऊठलो होतो आणि घरात कोणिही नसल्याने स्वतःच चहा बनवण्याची तयारी करत होतो. ’आल्या अथित्या मुठ्भर द्याया मागे पुढती पाहू नको!’ ह्या आनंद फंदिंच्या फटक्याला जागुन त्यांना चहा विचारला व ते सगळे जण एक सुरात ’हो’ बोलले.... आता झाली ना पंचाईत ! दुध फक्त २ कप चहाचे आणि हे बाई व इमानदार पकडुन १५ जण... त्यातल्या त्यात एक गरिब इमानदार पकडला व त्याला पैसे देऊन बिल्डींग खालच्या भट कडून १६ कप चहा मागवला.... आता ह्या बाईंनी ताबा घेतला व आपण केलेल्या कामाची उजळणी चालू केली, माझ्या घराचा हॉल म्हणजे व्यासपिठ झाले होते... ही बाई आणि माझ्या पोटातले कावळे एकजात एकसुरात ओरडत होते... तितक्यात तो गरिब इमानदार आला व माझी त्या भाषणातून सुटका झाली... मी त्या बाईंना विश्वास दिला की हे मत तुम्हालाच मिळणार , तसेही आपले संबंध (वैयक्तिक) खुप जुने आहेत... त्यावर बाई खुश होऊन निघुन गेल्या...

    सुंदराबाई जातात न जातात तोच त्यांचे खंदे विरोधक अण्णासाहेब दरवाज्यात उभे !..... आता हे अण्णासाहेब म्हणजे तेव्हा होणाऱ्या आणि आताच्या झालेल्या सासरचे , मान ठेऊन त्यांना पण आत बोलवले व त्यांनी लाजेखातर का होईनात पण चहा नाही सांगितला.... परत तेच बोलणे चालू झाले... ह्यांनी गटार साफ केली तर त्यांनी कचरा कुंड्या लावल्या... ह्यांनी स्मशानाची जागा वाढवली तर त्यांनी विद्युतदहनीका लावली... मी ह्यांना पण मत देण्याचे आश्वासन देतच होतो की सुंदराबाई त्यांचा राहिलेला मोबाईल घ्यायला आल्या!!!.... खप्प... माझी बोलतीच बंद झाली...

बाई गरजल्या : ’अण्णासाहेब, विशुभाऊ फितणार नाहीत ! आमचे संबंध जुने आहेत !’
अण्णासाहेब:  संबंध ?? बाई आमच्या होणाऱ्या जावयावर नसते आरोप सहन नाहि करणार!! याद राखा !!!
सुंदराबाई : काय हो ...... मतदान करणे हा काय नसता आरोप आहे का??? काल रात्री कुठे होतात हे मला बरोबर माहित आहे ....
अण्णासाहेब: @#%^$&$$%&%*
सुंदराबाई: *^^*(%$#%

मी डोक्याला हात लावला.... त्यांना दोघांना शांत करत मी सांगितले " तुम्ही दोघांनी सुध्दा समाजासाठी खुप काम केले आहे !, पण दुर्देवाने मी उद्याच २ महिन्या साठी परदेशी जात आहे, तेव्हा कृपाकरुन भांडण थांबवा, व कोणीही निवडून आले तरी मला आनंदच आहे!" त्यावर दोघेजण मला शिव्याशाप देत निघुन गेले, व माझी सुटका झाली.....

आपला,
(मतदाता) विशुभाऊ

४ टिप्पण्या: