हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

कोसला

kosala
खरेतर हे विशुभाऊने स्वतः लिहायला पाहिजे होते. पण भालचंद्र नेमाड्यांनी मला 'शंभरातल्या नव्व्याण्णवांस' अर्पण केल्या मुळे आणि विशुभाऊ ९९% मधला निघाल्या मुळे, अगदीच सामान्य निघाला. तसा सुरवातीला मी आकाश गुप्ते कडे होतो तेथून सौरभ बोंगाळे कडे आणि नंतर विशुभाऊ कडे आलो. सुरुवातीला मला थोडे फार उदाहरणार्थ चाळल्या नंतर विशुभाऊ मला सिंगापूरला घेऊन निघाला पण वजन जास्त झाल्यामुळे मी पुन्हा घरी गेलो. दिवाळीत एकदाचा मी सिंगापूरला पोहचलो. खरं तर तुम्हाला वगैरे सांगण्या सारखे एवढेच.
इथे आल्यावर सुरुवातीला दोन दिवस विशुभाऊने मला कपाटातच ठेवले. नंतर उदाहरणार्थ त्याच्या बरोबर ऑफिसला, चहाला, जेवायला आणि सगळी कडेच जायला लागलो. तो कामाच्या नावाखाली कंपनीला फसवतो वगैरे हे मला लगेच कळले. सुरुवातीला विशुभाऊला असे वाटत होतं कि मी सायको वगैरे आहे. पण नंतर त्याला उत्साह वगैरे यायला लागला. एकदा आम्ही ऑफिस मध्ये रंगात आलो असताना अचानक भले मोठे काम आले. त्याने उदाहरणार्थ सर्वर वरच्या एक दोन लायब्ररी फाईल बदलल्या आणि ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे सांगुन सिस्टीम ऍडमीनला कामाला लावले. मला कळले हा इचल्या पेक्षा चाप्टर आहे. पण मनू  गेली तेव्हा हा ऑफिस मध्ये सुध्दा रडला. मला म्हणाला नंतर तू अजंठाला गेलास ते बरे. पण बदललास.
ऑफिसमध्ये येता जाता बस मध्येतर आम्ही धिंगाणा घालायाचोच पण रात्री जेवताना तर धमाल. सिंहगडची गोष्ट सांगताना तो इतका रंगला कि माझ्या ऐवजी तोच घसरून पडला बसल्या बसल्या. त्या हॉटेल मधल्या मलय बाईने माझ्या कडे पाहून विचारले 'व्हीच भाषा' तर पठ्ठ्याने लगेच सांगितले 'मराठी भाषा'. ह्याने आपल्या भाषेचा चांगलाच प्रचार केलेला आहे.
तर मी बापाचा पैसा खर्चावून परीक्षा वगैरे नीट कधीच दिल्या नाहीत आणि म्हणूनच तुम्हा लोकांच्या म्हणजे 'शंभरातल्या नव्व्याण्णव' जणांच्या हृदयात बसू शकलो. आता इथे वगैरे सांगणे एवढेच. पुढे तुम्हीच वाचा. मी निघतो आहे. विशुभाऊ कडे उद्या पासून शाळेतला जोशी पुन्हा येतो आहे.
तर मी वर्ष च्या वर्ष फुकट घालवून कमावले काहीच नाही. तेव्हा गमावली हि भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबर.
असाच लोभ असावा.
आपला,
पांडुरंग सांगवीकर

१४ टिप्पण्या:

  1. >> तो कामाच्या नावाखाली कंपनीला फसवतो वगैरे हे मला लगेच कळले

    शंभर टक्का सत्य :P

    उत्तर द्याहटवा
  2. >> तो कामाच्या नावाखाली कंपनीला फसवतो वगैरे हे मला लगेच कळले

    आपण युनियन काढायला हवी विशूभाऊ...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हा हा हा !!!! खरंच . . . आपल्या सारखे भरपुर मिळतील. . . निदान ११ मिळाले तरी युनियन स्थापन करता येते !!! :D

      हटवा
    2. युनियनमध्ये सदस्य हवेत का विशुभाऊ... युनियनची मिटिंग वेताळ टेकडीवर करू :) :)

      हटवा
    3. नक्की सुझे . . . संध्याकाळी दिवे लागणिला !

      हटवा
  3. साक्षात पांडुरंगने बोलणं म्हणजे थोरच :-)

    उत्तर द्याहटवा